रिक्षात चौथी सीट बसवणं पडलं महागात; पोलीस ॲक्शन मोडमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:29 IST2022-11-04T15:29:05+5:302022-11-04T15:29:47+5:30
चौथी सीट बसवणाऱ्या रिक्षाचालकांना थंबवण्यात आले. त्यांचे मोबाईल वरून फोटो काढण्यात आले आणि दांडात्मक कारवाई करण्यात आली.

रिक्षात चौथी सीट बसवणं पडलं महागात; पोलीस ॲक्शन मोडमध्ये!
- मयुरी चव्हाण
डोंबिवली : सकाळी लेट मार्कची भीती म्हणून ऍडजस्टमेन्ट... दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा घरी जायची ओढ म्हणून ऍडजस्टमेंट... करणार काय चाकरमान्यांना रिक्षा शिवाय पर्यायच नाही... त्यात कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा प्रवास म्हटले की, वाद हा येतोचं... सुशिक्षित मध्यमवर्गीय चाकरमान्यांची ही शहरं...गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांवरील कारवाई मंदावली होती. मात्र, गुरुवारी रात्री पुन्हा वाहतूक पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसले. चौथी सीट बसवणाऱ्या रिक्षाचालकांना थंबवण्यात आले. त्यांचे मोबाईल वरून फोटो काढण्यात आले आणि दांडात्मक कारवाई करण्यात आली.
चौथ्या सीटवर बसून प्रवास करण हे धोकादायक आहे. मात्र कामावरून आल्यावर घरी जायचं असल्याने चाकरमानी चौथ्या सीटवर बसणे पसंत करतात. डोंबिवली स्टेशन परीसरात अशा रिक्षाचालकांवर गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रिक्षाचालकांनी डोक्यावर हात मारून घेतला. 15 ते 20 रुपये सीट दर आहेत आणि दंड 500 रुपये भरावा लागतो, अशी कुजबुज रिक्षाचालकांमध्ये सुरू झाली.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे आडव्यातीडव्या रिक्षा लावून गजबजलेला हा परिसर मोकळा श्वास घेत होता. कारवाईला घाबरून इतर रिक्षाचालकांनी रिक्षात तीन सीट बसवणंचे पसंत केले. आता या कारवाईमध्ये किती सातत्य राहते ते पाहाव लागेल. पण रिक्षात चौथी सीट बसवली जाते, याला जबाबदार कोण आहे? रिक्षाचालकं की प्रवासी? याबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.