Independent rickshaw travel in Dombivali will now cost for rs 21 | डोंबिवलीत स्वतंत्र रिक्षा प्रवास आता १ रुपयाने महागणार, आधीच २० रुपये घेत होते

डोंबिवलीत स्वतंत्र रिक्षा प्रवास आता १ रुपयाने महागणार, आधीच २० रुपये घेत होते

अनिकेत घमंडी 

परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा भाडेमध्ये ३ रुपयांची वाढ जाहीर केली असल्याने पहिल्या टप्प्यासाठी १८ ऐवजी आता २१ रुपये मोजावे लागणार आहेत, त्यामुळे डोंबिवलीकराना खऱ्या अर्थाने नियमानुसार स्वतंत्र रिक्षा प्रवासासाठी २० ऐवजी १ रुपया जादा द्यावा लागेल. काही वर्षे डोंबिवलीकर पहिल्या टप्प्यासाठी मीटर नसताना स्वतंत्र रिक्षा केली तर २० रुपये मोजत होते, त्यात आता १ रुपया वाढणार असल्याचे लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. तसेच पहिल्या टप्प्याला आता जे १० रुपये शेअर भाड्यात आकारले जातात त्यातही वाढ होणार नसल्याचे ते म्हणाले, परंतु लांबच्या टप्प्यात काहीशी वाढ होण्याची शक्यता असून त्याबाबत आरटीओने सर्व्हे करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

२०१४ पासून रोखून धरलेली प्रलंबित व कायदेशीर हक्काची रिक्षा-टँक्सी ची भाडेवाढ दिल्याबद्दल लालबावटा रिक्षा युनियन तर्फे या भाववाढीचे त्यांनी स्वागत केले. २०१४ पासून सरकारने रिक्षा -टँक्सी चालकांना भाडेवाढ दिली नव्हती. जगातील सर्व वस्तूंच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. फक्त रिक्षा-टँक्सी ची भाडेवाढ रोखण्यात आली होती. रिक्षा-टँक्सी भाडेवाढी बाबत हकीम समिती व खटुआ समीतीच्या शिफारशी राज्य सरकारने स्विकारलेल्या असताना सरकारने आठ वर्षे रिक्षा-टँक्सी ची भाववाढ रोखून धरली होती.

आठ वर्षे महाराष्ट्रातील विविध रिक्षा-टँक्सी संघटना या भाववाढीची मागणी करीत होत्या. २०२०मद्ये मार्च पासून लाँकडाऊन मुळे सहा महिने तर रिक्षा-टँक्सी पूर्णपणे बंद होत्या. सहा महिन्यानंतर सुरू करूनही ट्रेन, शाळा,काँलेज इत्यादी बंद असल्याने रिक्षा-टँक्सी रस्त्यावर धावत होत्या परंतु पन्नास टक्के धंदा मार खाल्ला होता. एक महिन्यापासून थोड्या प्रमाणात ट्रेन, शाळा, काँलेज सुरू झाल्या. तरीही धंदा पूर्वी सारखा होत नसे, त्यातच आता पुन्हा कोरोनाची संख्या वाढत असल्याने भाडेवाढ होऊनही रिक्षा-टँक्सी चालकांना काही महिने पोटभर धंदा मिळेल का? याबाबत प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून रिक्षा, टँक्सी चालक मालक सावकारी कर्जात मोठ्या प्रमाणात अडकला आहे. तसेच वित्त कंपनीच्या गुंडांनी कर्जदार रिक्षा चालकांना धंदा करणे व जगणे मुश्कील केले आहे.

रिक्षा-टँक्सी चालकांच्या अशा वाईट परिस्थितीत २०१४ पासूनची प्रलंबित व कायदेशीर हक्काची भाववाढ देऊन, सरकारने रिक्षा चालकांना फार मोठा दिलासा देऊन भाडेवाढीचा प्रश्न सोडवला आहे. या बद्दल परिवहन मंत्री अनिल परब यांचे डोंबिवलीतील हजारो रिक्षा चालकांच्या वतीने त्यांनी आभार मानले.
 

Web Title: Independent rickshaw travel in Dombivali will now cost for rs 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.