कल्याणमध्ये २ झोंबी! कोरेक्स औषध न दिल्याने मेडिकलमध्ये घातला राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 15:24 IST2022-03-05T15:23:57+5:302022-03-05T15:24:09+5:30
कल्याणजवळ बनेली येथील घटना, मेडिकलची केली तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याणमध्ये २ झोंबी! कोरेक्स औषध न दिल्याने मेडिकलमध्ये घातला राडा
कल्याण - अलीकडेच प्रदर्शित झालेला झोंबिवली हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. नशेच्या आहारी गेलेले तरूण एकमेकांच्या जीवावर उठतात. नशेसाठी कासावीस झालेले नशेखोर कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. कल्याणमध्ये घडलेल्या या घटनेने हीच प्रचिती तुमच्यासमोर येईल. कल्याणजवळ असलेल्या बनेली परिसरात मेडिकल चालकाने विना डॉक्टर प्रिस्क्रिप्शन कोरेक्स औषध देण्यास नकार दिल्यानं २ नशेखोर तरुणांनी मेडिकलची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
नशेखोर तरुणाचा हा थयथयाट सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. रात्रीच्या सुमारास हे दोन तरुण बनेली परिसरात डॉ.आंबेडकर चौक येथील वेलकम मेडिकलमध्ये आले. त्यांनी मेडिकल चालकाकडे कोरेक्स औषध मागितले. मेडिकल चालकाने डॉक्टरच्या परवानगी शिवाय हे औषध देऊ शकत नाही सांगत डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणण्यास सांगितले. मात्र हे नशेखोर ऐकण्यास तयार नव्हते. त्यांनी पुन्हा औषधाची मेडिकल दुकानदाराकडे मागणी केली मात्र मेडिकल चालकाने औषध देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या या दोन्ही नशेखोर तरुणांनी मेडिकल चालकाला ठोशाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळी केली. दोघे इथेच थांबले नाहीत तर मेडिकलचं काऊंटर व दोन फ्रिज ढकलून देत तोडफोड केली. काऊंटरवरील औषधे अस्त व्यस्त केली या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नशेखोरानी कोरेक्स औषधासाठी केलेल्या धिंगाण्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.