सराईत मोबाईल चोराला अटक; चार गुन्हे उघडकीस
By प्रशांत माने | Updated: September 30, 2022 16:49 IST2022-09-30T16:48:45+5:302022-09-30T16:49:35+5:30
रामनगर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली.

सराईत मोबाईल चोराला अटक; चार गुन्हे उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: पूर्वेकडील रामनगर रिक्षा स्टॅण्डवर बुधवारी प्रवासी भाडे घेण्यासाठी थांबलेल्या प्रशांत ठक्कर या रिक्षाचालकाच्या खिशातील मोबाईल हिसकावून पळणा-या चोरटयाला रामनगर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी सापळा लावून अटक केली.
गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, हवालदार विशाल वाघ यांच्यासह अन्य पोलिस कर्मचा-यांच्या पथकाने वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू रोड येथे सापळा लावून चोरटयाला जेरबंद केले. दिनेश उर्फ दिनू संतोष शिगवण (वय २२) असे या चोरटयाचे नाव आहे. त्याच्या चौकशीत चार गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील तीन गुन्हे रेल्वे तर एक गुन्हा रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याआधी त्याच्यावर मोबाईल चोरीचे सात गुन्हे दाखल आहेत. दोन वेळा तो चोरीच्या गुन्हयात शिक्षा देखील भोगून आला आहे.
दरम्यान त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक सानप यांनी दिली. त्याच्याकडून ४८ हजाराचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.