-मुरलीधर भवार, कल्याणकल्याण शीळ रस्त्यालगत नेकणी पाडा येथील बस स्टॉपला लागून असलेल्या ८४ गुंठे जागेच्या वाद हा न्यायप्रविष्ट आहे. या जागेच्या मालकी हक्कावरुन बाविस्कर आणि पाटील कुटुंबीय आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला. प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा वाद चिघळण्याची शक्यता असल्याने त्याठिकाणी पोलिसांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या वर्षभरात या जागेच्या वादातून बाविस्कर आणि पाटील कुटुंबीय यांच्यात वाद झाला आहे. काही दिवसापूर्वी बाविस्कर कुटुंबियांकडून पाटील कुटुंबियांच्या महिलांवर कंटेनर टेम्पो घालण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही पोलिसांनी धाव घेतल्याने हे प्रकरण काही काळासाठी शांत झाले होते.
पोलिसांकडून समज, पण वाद का झाला?
जागेच्या मालकी हक्कावरुन बाविस्कर आणि पाटील कुटुंबीय वारंवार आमने सामने येतात. आजही त्याठिकाणी कंटेनर केबिन जागेत ठेवण्याच्या वादातून दोन्ही कुटुंबिय आमने सामने आले. यामुळे कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. ही माहिती मिळता मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही पक्षाकडून मालकी हक्काचा दावा सांगण्यात येत असल्याने पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना त्याठिकाणी थांबू नये अशी समज दिली आहे.
पोलीस आमचं ऐकत नाहीत
बाविस्कर कुटुंबीयांकडून केदार चौधरी यांनी सांगितले की, 'ही जागा आमच्या मालकी हक्काची आहे. पाटील कुटुंबीयांना या जागेत येण्यास न्यायालयाने मनाई आदेश केला आहे. ठाण्यातील एका व्यक्तीचा पाटील कुटुंबियांना पाठिंबा आहे. त्यामुळे पोलीस आमचे काही ऐकत नाहीत. हा प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अधिवेशनात उपस्थित करणार आहे.'
पोलीस बाविस्कर कुटुंबीयांना मदत करताहेत
पाटील कुटुंबियांच्या वतीने जितेश पाटील सांगितले की, 'या जागेवर आमचा ताबा आहे. या प्रकरणात पोलीस बाविस्कर कुटुंबियांना मदत करीत आहेत. जागा आमची असताना आम्हाला बाहेर काढले. या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री, पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे .आमच्या जीवितास काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?', असे ते म्हणाले.