कल्याणमध्ये १७ लाखाचा गुटखा जप्त; एक अटकेत तर दोन पसार
By मुरलीधर भवार | Updated: March 8, 2024 20:16 IST2024-03-08T20:15:03+5:302024-03-08T20:16:31+5:30
कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी १७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

कल्याणमध्ये १७ लाखाचा गुटखा जप्त; एक अटकेत तर दोन पसार
कल्याण- कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी १७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. गुजरातमधील वापी येथून हा ट्रक दुर्गाडी चौकाच आला असता ही कारवाई करण्यात आली. ट्रकचा चालक मोहंमद राजा मोनीस पठाण याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील विनोद गंगवाणी आणि अनिल हे दोन पसार झाले आहे. खडकपाडा पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत.
ट्रक चालक मोहमंद पठाण याला हा गुटखा गुजरातच्या अनिस नावाच्या इसमाने दिला होता. हा गुटख्याचा साठा कल्याण मार्गे उल्हासनगरला घेऊन जाणार होता. खडकपाडा पोलीसांचे पथक गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दुर्गाडी परिसरात गस्त घालत होते. गस्तीच्या वेळी त्यांना दुर्गाडी येथून एक ट्रक भरगाव वेगात येत असल्याचे दिसले. पोलिसांना त्या भरधाव ट्रकविषयी संशय आला. पोलिसांनी हा ट्रक थांबविला. ट्रक चालकाकडे विचारपूस केली. त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील ट्रकची पोलिसांनी तपासणी केली. ट्रकमध्ये १७ लाखाचा गुटखा असल्याचे आढळून आले. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक वाघमोडे ,पोलीस निरीक्षक ए. ए. शिवले ,पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने हा गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक मोहम्मद राजा मोनीस पठाण याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पसार झालेल्या अन्य दोन जणांचा पोलिस शोध घेत आहे. खडकपाडा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.