कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी विशाल गवळीने तिची गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात निष्पन्न झाले आहे. पोलिस तपासाकरिता विशालला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला नेण्यात आले होते. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपुष्टात येत असल्याने त्याला पुन्हा कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे.
यावेळी पोलिस त्याच्याविरुद्ध शास्त्रीय पुरावे सादर करणार असून विशालच्या पोलिस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
...त्यानंतर मुलीच्या मृत्यूचे खरे कारण उघड होणारअल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह बापगावजवळ फेकून दिला. त्याने कल्याणमधील एका बारमधून दारू खरेदी केली. त्यानंतर तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला पसार झाला होता.
शेगाव येथील सलूनमधून त्याला अटक केली होती. तपासाकरिता गवळीला तपास पथक शेगाव घेऊन गेले हाेते. विशालची पीडित मुलीशी ओळख होती. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जे. जे. रुग्णालयात पाठविला होता.
जे. जे. रुग्णालयातील तीन डॉक्टरांची समिती तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा अहवाल फाॅरेन्सिक लॅबला देणार आहेत. त्यानंतर मुलीच्या मृत्यूचे खरे कारण उघड होणार आहे. त्याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झालेला नाही.
ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती- रुग्णालयाने मुलीचा मृत्यू गळा दाबल्याने झाला, असा ॲडव्हान्स रिपाेर्ट दिला.- आरोपीच्या विरोधात शास्त्रीय पुरावे गोळा करण्यात आले असून ते न्यायालयासमोर पोलिस तपास पथकाकडून सादर केले जाणार आहेत. या प्रकरणी राज्य सरकारने ॲड. उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपायुक्त झेंडे यांनी दिली.
‘हत्या प्रकरणाचे राजकारण नको’- उद्या आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले जाणार असल्याने नागरिकांनी आंदोलन करावे, असे आवाहन करणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. - याविषयी पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे राजकारण करू नये. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.आराेपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत.