मनपा कर्मचारी हल्ला प्रकरणात चौघांना अटक; घाबरविण्यासाठी केला हल्ला
By प्रशांत माने | Updated: December 1, 2023 18:08 IST2023-12-01T18:07:38+5:302023-12-01T18:08:25+5:30
डोंबिवली: केडीएमसीचे वाहनचालक विनोद लकेश्री यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चौघा आरोपींना रामनगर पोलिसांनी मुंबई, घाटकोपर येथून अटक केली. लकेश्री यांना ...

मनपा कर्मचारी हल्ला प्रकरणात चौघांना अटक; घाबरविण्यासाठी केला हल्ला
डोंबिवली: केडीएमसीचे वाहनचालक विनोद लकेश्री यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चौघा आरोपींना रामनगर पोलिसांनी मुंबई, घाटकोपर येथून अटक केली. लकेश्री यांना घाबरविण्यासाठी हल्ला केल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले असून पण घाबरविण्याचे कारण काय? या हल्ल्यामागचा सूत्रधार कोण? याचे गुढ मात्र कायम राहीले आहे. चौघेही आरोपी रिक्षाचालक आहेत.
कमरूद्दीन ईस्माईल शेख ( वय २५), अरबाज वहाब सय्यद (वय २६), इस्त्राईल मोहिददीन शहा ( वय ३०) आणि शाहरूख मो. फझरूद्दीन शेख (वय २२) सर्व रा. घाटकोपर अशी अटक आरोपींची नावेे आहेत. मनपाचे वाहक असलेले लकेश्री यांच्यावर सोमवारी रात्री ८.४० ते ८.४५ या दरम्यान केडीएमसी विभागीय कार्यालयाजवळील खोजा जमादखाना गेटच्या समोरील रोडवर धारदार चाकूने वार केल्याची घटना घडली होती. यात लकेश्री यांच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि कोपराच्या खाली गंभीर दुखापत झाली आहे. हा हल्ला रहदारीच्या ठिकाणी झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
लकेश्री यांच्यावर वार करणारा परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. पोलिसांनी अन्य ठिकाणचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता आणखीन तिघे आजुबाजुला संशयास्पद आणि घटना घडल्यानंतर पळताना दिसून आले. सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गित्ते, पोलिस निरिक्षक (गुन्हे ) आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, शहाजी नरळे, पोलिस उपनिरिक्षक अजिंक्य धोंडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, तानाजी वळवडे, पोलिन नाईक हनुमंत कोळेकर, पोलिस शिपाई शिवाजी राठोड, निलेश पाटील आदिंचे पथक नेमले गेले होते. दरम्यान गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चौघांची घाटकोपर येथून धरपकड करण्यात आली. चौघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
उद्या न्यायालयात हजर करणार
चौघा आरोपींना शनिवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान हा हल्ला घाबरविण्यासाठी केला गेला असे आरोपींकडून सांगितले गेल्याचे पोलिस सांगत असलेतरी यामागचे कारण आणि सूत्रधार, कितीची सुपारी दिली या प्रश्नांवर तपास सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी मौन बाळगले आहे.