शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला, माजी प्र-कुलगुरू अशोक प्रधान यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:01 IST2024-10-15T12:01:01+5:302024-10-15T12:01:37+5:30
मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून अशोक प्रधान यांच्या कामाची सुरुवात झाली.

शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला, माजी प्र-कुलगुरू अशोक प्रधान यांचे निधन
डोंबिवली: अनेक नानाविध संकल्पनांनी शिक्षण क्षेत्राला नवे आयाम प्राप्त करून देणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ अशोक प्रधान(८५) यांचे मंगळवारी कल्याणमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शोभना प्रधान, मुलगा समीर प्रधान, सोनाली प्रधान आणि प्रणाली प्रधान असा परिवार आहे.
मुंबईतील रुपारेल महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून अशोक प्रधान यांच्या कामाची सुरुवात झाली. आणि नंतर आपल्या उत्कृष्ट कामाच्या बळावर याच कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्यपदही भूषविले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात उप कुलगुरूपद आणि मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कुलगुरूपद भुषवताना त्यांनी केलेल्या कामाची शिक्षण क्षेत्रात आजही प्रशंसा केली जाते.
त्यासोबतच त्यांनी सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक अशी ओळख असलेल्या कल्याण जनता सहकारी बँक, कल्याण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदेही त्यांनी सक्षमपणे भूषवली. गेल्याच महिन्यात १६ सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस होता.
यंदाच्या गुढीपाडवा शोभायात्रेत देखील ते सहभागी झाले होते, त्या आठवणी देखील त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली. कल्याणातील विविध शिक्षण तसेच सहकारी क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरू शकणार नाही. त्यांच्या निधनाने कल्याणातील सर्वच स्तरांतील व्यक्तींकडून शोक व्यक्त करण्यात आला.