जप्त केलेल्या दुचाकींना आग, कल्याणची घटना : फटाक्यामुळे आग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:47 IST2020-11-25T00:46:55+5:302020-11-25T00:47:04+5:30
कल्याणची घटना : फटाक्यामुळे आग?

जप्त केलेल्या दुचाकींना आग, कल्याणची घटना : फटाक्यामुळे आग?
कल्याण : शहरातील एका हाय प्रोफाईल सोसायटीच्या तळमजल्यावर पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेल्या दुचाकींना आग लागल्याने खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित या आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रोडवर विकास हाईटस् सोसायटीच्या तळमजल्यावर पोलिसांची पार्किंग आहे. बाजारपेठ आणि महात्मा फुले चौक पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेल्या शेकडो दुचाकी या ठिकाणी ठेवल्या आहेत. सोमवारी रात्री ११.३० वाजता पार्किंगमध्ये अचानक धूर निघू लागला. काही रहिवाशांनी हे पाहिले आणि काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या आगीत ३ ते ४ दुचाकी जळाल्या आहेत. मंगळवारी सकाळी कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार आणि महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत पोवार यांनी सांगितले की, फटाक्याची ठिणगी उडून ही आग लागली असावी. तपास सुरू आहे.