थट्टामस्करीतून मारामारी अन् नंतर गळ्यात गळे; उद्धवसेनेच्या मुलाखतीवेळी दोन पदाधिकाऱ्यांत राडा : व्हिडीओ आला तरी इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:38 IST2025-12-23T09:37:52+5:302025-12-23T09:38:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : उद्धवसेनेचे कल्याण पश्चिमेतील पदाधिकारी निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाणे या दोघांमध्ये सोमवारी इच्छुक उमेदवारांच्या ...

थट्टामस्करीतून मारामारी अन् नंतर गळ्यात गळे; उद्धवसेनेच्या मुलाखतीवेळी दोन पदाधिकाऱ्यांत राडा : व्हिडीओ आला तरी इन्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : उद्धवसेनेचे कल्याण पश्चिमेतील पदाधिकारी निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाणे या दोघांमध्ये सोमवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी वाद झाला. हे प्रकरण अगदी तुंबळ हाणामारी होऊन रक्तबंबाळ होण्यापर्यंत गेले. गणेशघाट डेपोजवळ हा प्रकार घडला. या दोघांत पक्षाच्या वरिष्ठांनी समेट घडविल्याने नंतर त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली व आमच्यात कोणताही वाद झाला नाही, असे स्पष्टीकरण दिले. मात्र तोपर्यंत यांच्यातील हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
गणेश घाट डेपोजवळ उद्धवसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या. त्याठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक जमले होते. शहरप्रमुख बाळा परब यांच्यासह अन्य काही जण उपस्थित होते. निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाणे यांच्यात चर्चा सुरू होती. थट्टा-मस्करीतून सुरू झालेला वाद टोकाला गेला. दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटवला. त्यानंतर दोघांनी गळाभेट घेतली. मात्र तोपर्यंत त्यांच्या वादाचा आणि हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोघेही निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे सांगण्यात आले. बैसाणे म्हणाले की, आमच्यात काही वादच नव्हता. थट्टामस्करीतून हा प्रकार घडला. दरम्यान, कल्याण पश्चिमेतून इच्छुक मर्यादित असल्याने उद्धव सेनेत नाराजी आणि बंडखोरी होण्याची शक्यता कमी आहे.
९७ जण लढण्यास इच्छुक
उद्धवसेनेचे कल्याण पश्चिमेचे शहरप्रमुख बाळा परब म्हणाले की, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे ४२ प्रभाग असून निवडणूक लढविण्यास ९७ जण इच्छुक आहेत. मनसेसोबत आमची युती होणार आहे. याबाबत मनसेचे नेते राजू पाटील आणि उद्धवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांची बैठक पार पडली आहे. कल्याण पश्चिमेतून मनसेने १२ जागा मागितल्या आहेत. उर्वरित ३० जागा उद्धवसेना लढविणार आहे. आज ४२ प्रभागातून इच्छुक असलेल्या ९७ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या.