सिंधी शाळा, अरेबिक लिपी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर
By सदानंद नाईक | Updated: March 15, 2025 08:39 IST2025-03-15T08:39:58+5:302025-03-15T08:39:58+5:30
सदानंद नाईक उल्हासनगर : एकेकाळी उल्हासनगरात समृद्ध असलेल्या सिंधी भाषिक शाळा एकापाठोपाठ बंद पडत आहेत. बहुतांश सिंधी शाळा बंद ...

सिंधी शाळा, अरेबिक लिपी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर
सदानंद नाईक
उल्हासनगर : एकेकाळी उल्हासनगरात समृद्ध असलेल्या सिंधी भाषिक शाळा एकापाठोपाठ बंद पडत आहेत. बहुतांश सिंधी शाळा बंद पडल्याने, सिंधी अरेबिक लिपी जिवंत राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीला संघर्ष करावा लागत आहे. सिंधी अरेबिक लिपी शिकण्याकडे सिंधी समाजातील तरुणाईचा कल नसल्याने, अरेबिक ऐवजी सिंधी देवनागरी भाषेचा वापर केला जात आहे. परिणामी सिंधी अरेबिक भाषेतील प्राचीन ग्रंथसंपदा, सिंधी भाषेचा इतिहास यापुढे कोणी वाचणार की नाही? असा सवाल सिंधी अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
काळाची गरज म्हणून सिंधी समाजाने सिंधी शाळेकडे पाठ फिरवून इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा स्वीकार केला. त्यामुळे सिंधी शाळा एकापाठोपाठ बंद झाल्या. सिंधी भाषा जिवंत रहावी म्हणून काही संस्था सेमी इंग्रजी शाळा चालवीत आहेत. या शाळांत सिंधी भाषा शिकवली जाते, अशी माहिती बी. जे. टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा ठाकूर यांनी दिली. मात्र अरेबिक लिपी ऐवजी देवनागरीचा वापर सिंधी शिकविण्याकरिता केल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.
अरेबिक ऐवजी सिंधी लिपी देवनागरीमध्ये
सिंधी अरेबिक भाषेत सिंधी समाजाचा प्राचीन इतिहास लिहिला गेला असून, सिंधी समाजाने सिंधीऐवजी इंग्रजी भाषेचा स्वीकार केला. घरातही सिंधी भाषा बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे ओळखून सिंधी अरेबिक लिपीसोबत देवनागरीत सिंधी साहित्य लिहिण्यास सुरुवात केली, असे साहित्यिक प्रा. जगदीश लाच्छानी यांनी सांगितले.
सिंधी भाषेत लिहिलेला इतिहास, संस्कृती जिवंत राहण्यासाठी अकादमी प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे सिंधी भाषेच्या शाळा बंद पडल्याने जर्मन, जपानी, आदी भाषेप्रमाणे सिंधी भाषा देवनागरी लिपीत शिकविली जाणार आहे - महेश सुखरामानी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी
महापालिकेच्या सिंधी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या. बी. जे. टिळक व अन्य एका खासगी संस्थेची सिंधी माध्यमाची सेमी-इंग्रजी शाळा आहे. मात्र विद्यार्थी पटसंख्येअभावी या दोन शाळासुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत- रेखा ठाकूर, मुख्याध्यापक, बी. जे. टिळक विद्यालय