Eknath Shinde's trick to avoid crowds; Dedication of Vadavalli bridge without cutting the ribbon | गर्दी टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी लढवली युक्ती; फित न कापताच वडवली पूलाचे केले लोकार्पण

गर्दी टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी लढवली युक्ती; फित न कापताच वडवली पूलाचे केले लोकार्पण

कल्याण : आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान उभारण्यात आलेल्या वडवली रेल्वे उड्डाण पूलाच्या लोकार्पण कार्याक्रमात गर्दी टाळण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी युक्ती केली. पूलाचे लोकार्पण फित न कापता त्यावरुन गाड्यांचा ताफा नेऊन लोकार्पण केले. (Eknath Shinde's trick to avoid crowds; Inaugaration of Vadavalli bridge without cutting the ribbon)

या लोकार्पण सोहळ्य़ास शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपा खासदार कपील पाटील आणि शिवेसना आमदार विश्वनाथ भोईर, भाजपा आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी होते. पूलाच्या लोकार्पणास भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. परिस्थितीचे भान ठेवत पालकमंत्र्यांनी पूलाची फित न कापताच त्यावरुन गाडय़ांचा ताफा नेत यू-टर्न मारुन ते पुन्हा कल्याण मुरबाड रोडवरील वालधूनी पूलाचे लोकार्पण करण्यास पोहचले. त्याठिकाणीही त्यांनी फित कापली नाही. केवळ कोनशिलेचे अनावरण करुन पूलाचे लोकापर्ण झाल्याचे जाहीर केले. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, वडवली पूलाची लोकांची मागणी होती. काही कारणास्तव त्यात विलंब झाला. पूल खुला झाल्याने याठिकाणचे रेल्वे फाटक बंद होणार आहे. फाटक बंद झाल्याने रेल्वे गाडय़ांना फाटकामुळे होणारा विलंब टळणार आहे.
वडवली रेल्वे उड्डाणपूलाच्या लोकार्पणानिमित्त पूलाच्या कडेला शिवसेना भाजपाने  झेंडे लावले होते. एकापाठोपाठ लावण्यात आलेले झेंडे पाहता. दोन्ही पक्षात श्रेयवादासाठी असलेली चढाओढ दिसून आली.

भाजपा आमदार चव्हाण  यांनी सांगितले की, वडवली पूलाच्या काम सुरु झाले. तेव्हा शिवसेना भाजपा युती होती. त्यामुळे वडवली पूलाच्या कामात भाजपानेही पाठपुरावा केलेला आहे. शिवसेना भाजपा यांच्या आजच्या घडीला विस्तव जात नसल्या तरी वडवली पूलाच्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे खासदार आमदार एकत्रित आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

अधिक भाष्य करणो योग्य नाही..
सचिन वाझे प्रकरणी पालकमंत्री शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने त्यावर अधिकचे भाष्य करणे योग्य नाही, असे सांगितले.

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची घेतली दखल
कल्याण डोंबिवली महापालिकेने घातलेल्या निर्बंधाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आज डोंबिवलीत रास्ता रोको आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची पालकमंत्र्यांनी दखल घेतली. कल्याण मुरबाड रस्त्यावरील नव्या पूलावरच भाजपा खासदार  पाटील, भाजपा आमदार चव्हाण आणि आयुक्तांसोबत उद्या रविवारसाठी शिथिलता देण्यात आली आहे. उद्या होळी निमित्त दुकाने खुली राहणार आहेत. मात्र व्यापारी रविवारचा बंद नियम सोमवारी पाळणार आहे, असा चर्चेअंती तोडगा काढण्यात आला आहे. त्याला व्यापाऱ्यांनीच मान्यता दिली आहे.

Web Title: Eknath Shinde's trick to avoid crowds; Dedication of Vadavalli bridge without cutting the ribbon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.