महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित
By सचिन सागरे | Updated: March 31, 2024 17:57 IST2024-03-31T17:56:47+5:302024-03-31T17:57:03+5:30
महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित
कल्याण : महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ दरम्यानच्या १०० केव्ही वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर चारच्या काही भागांमधील महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास झालेला बिघाड महापारेषणकडून दुरूस्त होईपर्यंत संबंधित भागात भार व्यवस्थापन करून वीजपुरवठा करण्यात आला.
महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातून अंबरनाथकडे येणाऱ्या १०० केव्ही उच्चदाब वाहिनीत रविवारी सकाळी बिघाड झाला. परिणामी या वाहिनीवरून वीजुपरवठा होणाऱ्या महावितरणच्या बदलापूर पूर्व आणि पश्चिम, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम तसेच उल्हासनगर चार उपविभागातील कांही भागांचा वीजपुरवठा बाधित झाला. महापारेषणकडून बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सूरू होते. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिघाड दुरूस्त होऊ शकला नव्हता. त्यामुळे पडघा ते मोहने या उच्चदाब वाहीनीद्वारे उपलब्ध स्त्रोताच्या आधारे भार व्यवस्थापन करून बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगर चार उपविभागात चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा सुरू होता. दरम्यान सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मुख्य बिघाड निदर्शनास आला असून महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्रीही महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील सीटीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर आणि परिसरातील महाविरतणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता.