दरवाजा उघडाच राहिला अन् मुलीचे हातपाय बांधून २ लाखांची लूट; पळवण्याचा डाव उधळला

By प्रशांत माने | Published: November 27, 2023 05:30 PM2023-11-27T17:30:38+5:302023-11-27T17:32:57+5:30

व्यवसायाने डॉक्टर असलेले वडील बाहेर गेले होते. आई शेजारील इमारतीमध्ये काही कामानिमित्त गेली होती.

Dombivli forcibly tied hands and feet of 8-year-old girl and thieves stole Rs 1 lakh cash from the house | दरवाजा उघडाच राहिला अन् मुलीचे हातपाय बांधून २ लाखांची लूट; पळवण्याचा डाव उधळला

दरवाजा उघडाच राहिला अन् मुलीचे हातपाय बांधून २ लाखांची लूट; पळवण्याचा डाव उधळला

डोंबिवली: एकीकडे बंद घरे फोडून चोरटयांकडून घरातील ऐवज लांबविण्याचे प्रकार सुरू आहे. तर दुसरीकडे उघडया दरवाजावाटे घुसून घरात एकटया असलेल्या आठ वर्षाच्या मुलीचे हात-पाय बांधत, तोंडात बोळा कोंबून घरातील रोकड आणि दागिने असा १ लाख ९० हजाराचा मुद्देमाल चोरटयांनी लांबवला. हा खळबळजनक प्रकार रविवारी सहा ते पावणेसात दरम्यान डोंबिवलीतील नांदीवली टेकडी परिसरातील एका इमारतीत घडला आहे. दोघे चोरटे सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले असून त्यांनी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न देखील केला पण मुलीने केलेल्या प्रतिकारामुळे तो निष्फळ ठरला.

व्यवसायाने डॉक्टर असलेले वडील बाहेर गेले होते. आई शेजारील इमारतीमध्ये काही कामानिमित्त गेली होती. घरात मुलगी एकटी होती. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोघांनी इमारतीमध्ये प्रवेश केला आणि तिस-या मजल्यावरील एका घराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास येताच दोघांपैकी एकाने तोंडाला रूमाल बांधून घरात प्रवेश केला. तर दुसरा बाहेरच दरवाजापाशी थांबला. घरात मुलगी वॉशरूमला गेली होती. तो वॉशरूममध्ये घुसला आणि त्याने तीचे हात-पाय बांधले आणि आरडाओरड करू नये म्हणून तीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि तीला बाल्कनीत नेऊन ठेवले. त्यानंतर घरात रोकड आणि मौल्यवान वस्तूंची शोधाशोध सुरू केली. देव्हा-यात ठेवलेले आठ तोळयाचे मंगळसूत्र त्याला आढळुन आले. तसेच बेडरूमच्या कपाटातील रोकड असा १ लाख ९० हजाराचा मुद्देमाल त्याच्या हाती गावला. चोरी केल्यानंतर दोघे मुलीला उचलून घराबाहेर पडले आणि जीना उतरायला लागले. त्यावेळी मुलीने प्रतिकार केला आणि त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. दोघेही पळून गेले असून याप्रकरणी मुलीच्या कुटुंबाला हा प्रकार समजताच त्यांनी मानपाडा पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाला सुरूवात केली आहे.

चोरटे सीसीटिव्हीत कैद

चोरी करण्यासाठी आलेले दोघेजण इमारतीच्या आसपास असलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. दरम्यान या घटनेत अल्पवयीन मुलीची सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न झाल्याने पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी दिली.

ऐवज गेला पण मुलगी सुरक्षित राहीली हे माझ्यासाठी मौल्यवान

मुलीने प्रतिकार केल्याने तीला पळवून नेण्याचा चोरटयांचा प्रयत्न निष्फळ ठरला. दागिने आणि रोकड असा ऐवज गेला. चोरटे पोलिसांकडून पकडले जातील. पण माझी मुलगी सुरक्षित राहीली ही बाब माझ्यासाठी मौल्यवान असल्याची प्रतिक्रिया मुलीच्या वडीलांनी दिली.

Web Title: Dombivli forcibly tied hands and feet of 8-year-old girl and thieves stole Rs 1 lakh cash from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.