CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 00:16 IST2025-12-18T00:14:27+5:302025-12-18T00:16:30+5:30
अंबरनाथ, बदलापूरकरांसाठी पुढच्या चार महिन्यात 'मेट्रो'चे काम सुरू करणार- देवेंद्र फडणवीस

CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
अंबरनाथ: अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना जास्तीत जास्त फायदा होईल, अशी मेट्रो सेवा देण्याचे काम सरकार करत आहे. मेट्रो-14चे काम येत्या चार महिन्यात सुरू केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथमध्ये झालेल्या जाहीर सभेत दिली. अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता आलो नाही. ज्यांच्याजवळ विकासाचा अजेंडा नसतो ते टीका करतात, असेही फडणवीस म्हणाले. चार्टड अकाउंट नगराध्यक्ष उमेदवार सर्वांचा हिशोब ठेवतील आणि ज्यांचा हिशोब करायचा त्यांचा हिशोब करतील. आपल्याला नगरपालिकेत पारदर्शी कारभार आणायचा आहे. याठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही, कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही, तर एकप्रकारे पारदर्शीपणे काम करणारी नगरपालिका आपल्याला तयार करायची आहे, असे ते म्हणाले.
आपण निवडणुकीत बाता मारणारे लोक नाही, भविष्यकाचा विचार करणारे लोक आहोत. अंबरनाथ-बदलापुरात काँक्रिट रस्ते आणि विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. ३७० किमी मेट्रो लाईनचा प्रकल्प तयार केला असून जवळपास २ लाख कोटींची कामे सुरु केली आहेत. मेट्रोचे नेटवर्क तयार करण्यात येत आहे. मेट्रो ५, १२, आणि १४ चा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मेट्रो १४ चा सर्वाधिक फायदा मोठा अंबरनाथला होणार आहे. कांजूरमार्ग ते अंबरनाथ ही मेट्रो होणार आहे. तसेच कल्याण-बदलापूर ३ व ४ रेल्वे मार्गिकेचे काम वेगाने सुरु केले असून अधिकचे डब्बे लावणे सुरु केले," असेही ते म्हणाले.
रेल्वे मंत्र्यांना सांगून १५ डब्याची लोकल सुरु झाली पाहिजे. सरकारने निर्णय केला असून पुढील ३ वर्षात लोकलचे सर्व डब्बे एसीचे करू. त्यांचे दरवाजे बंद होणार आहेत, विशेष म्हणजे लोकलच्या द्वितीय श्रेणी डब्याचा जो तिकीट दर आहे, त्यात एक रुपयाही वाढवणार नाही. तेच दर एसी लोकलचे राहतील. शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी ताण येत आहे. त्यामुळे नगरपालिका, महापालिका पाण्याचा कोटा वाढवून मागण्यासाठी भांडत असतात. त्यामुळे पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शीलार आणि पोशीर धरणाचे टेंडर केले असून काम सुरु आहे. त्यामुळे एमएमआर रिजनचा पाणी प्रश्न मिटणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.