सिध्दी चायनीज सेंटरमध्ये सिलेंडरचा स्फोट; आग विझवायला गेलेले ९ जण जखमी
By प्रशांत माने | Updated: May 29, 2024 18:42 IST2024-05-29T18:42:17+5:302024-05-29T18:42:43+5:30
बंद सेंटरला आग लागल्याने ती विझविण्यासाठी आजुबाजुचे वसाहतीमधील रहिवासी धावले यात अचानक आतील सिलेंडरचा स्फोट झाला

सिध्दी चायनीज सेंटरमध्ये सिलेंडरचा स्फोट; आग विझवायला गेलेले ९ जण जखमी
डोंबिवली: एमआयडीसीतील अमुदान या रासायनिक कंपनीत स्फोटाच्या घटनेला आठ दिवसांचाही कालावधी उलटत नाही तोच येथील टंडन रोडवरील सिध्दी चायनीज सेंटरमध्ये आग लागून झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजता घडली.
जखमींपैकी तीन जणांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात तर इतर सहा जणांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातजण किरकोळ जखमी तर अन्य दोघेजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
चायनीज सेंटर बंद असताना ही घटना घडली आहे. बंद सेंटरला आग लागल्याने ती विझविण्यासाठी आजुबाजुचे वसाहतीमधील रहिवासी धावले यात अचानक आतील सिलेंडरचा स्फोट झाला. यात नऊजण जखमी झाले. सर्वांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले असून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.