पाथर्लीतील कोरोनाचे लसीकरण केंद्र होणार बंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:35 IST2021-03-11T00:35:22+5:302021-03-11T00:35:22+5:30
शाळेत लसीकरणाला परवानगी नाही : भोंगळ कारभाराचा फटका

पाथर्लीतील कोरोनाचे लसीकरण केंद्र होणार बंद?
अनिकेत घमंडी
डोंबिवली : पूर्वेतील पाथर्ली भागातील केडीएमसीच्या भिसे शाळेत सुरू करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण केंद्राला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार शाळांमध्ये असे केंद्र चालवण्यास परवानगी नाही. त्यामुळे हे केंद्र अवघ्या पाच दिवसांत गुरुवारपासून बंद होण्याची शक्यता असल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
भिसे शाळेतील केंद्रात केडीएमसीच्या डॉ. शीतल पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १२ मार्चपासून कोरोना लसीकरण सुरू केले. तेव्हापासून या केंद्रावर बुधवारपर्यंत एक हजार ७६८ नागरिकांनी लसीकरण केले. मात्र, सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार आता शाळेत लसीकरण करणे योग्य नाही. त्यामुळे आता पुढे काय?, असा पेच या परिसरातील नागरिकांसमोर पेच उभा राहिला आहे. नागरिकांनी हे केंद्र बंद करू नये, अशी विनंती त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली. परंतु, वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे हे केंद्र गुरुवारी महाशिवरात्री असल्याने बंद असणार आहे. त्यामुळे शुक्रवारी लसीकरण केंद्र सुरू असेल की नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
टोकनसाठी केंद्रावर गोंधळ, पोलीस घटनास्थळी
nकेडीएसमीची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते या केंद्रावर येऊन त्यांच्या ओळखीच्या नागरिकांना आधी लसीकरण करायला मिळावे, यासाठी टोकन मिळवण्यासाठी केंद्राच्या
प्रवेशद्वारावर अडवणूक करत असल्याचे बुधवारी दिसून आले. त्यामुळे
सकाळपासून आलेल्या नागरिकांना तिष्ठत बसावे लागले. अखेरीस प्रशासनाने सुमारे २०० नंबर घेऊन दिवसाचे लसीकरण बंद करणार असल्याचे सांगितले.
nमात्र, दुपारी १.१५ ते दुपारी २ च्या सुमारास या केंद्रावर गोंधळ झाला. त्यामुळे पोलिसांना येऊन हस्तक्षेप करावा लागला. या गोंधळाबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जर हे केंद्र बंद झाल्यास पूर्वेतून पश्चिमेला शास्त्रीनगर रुग्णालयात जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत.
राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार शाळेत कोरोना लसीकरण केंद्र असू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे पाथर्लीचे ते केंद्र बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याऐवजी क्रीडासंकुल, जिमखाना येथे मंडप टाकून केंद्र तयार होऊ शकते का? याची चाचपणी सुरू आहे. तसेच राज्य सरकारकडे या महापालिका परिसरातील १७ खासगी रुग्णालयांत लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अत्यावश्यक तत्वावर पाठपुरावा केला आहे.
- डॉ. प्रतिभा पानपाटील,
आरोग्य अधिकारी, केडीएमसी