‘माहिती अधिकार’ वापरून गुंड झाले ठेकेदार; अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल, छोट्या रकमेची कामे मिळवून घातला धुडगूस

By पंकज पाटील | Updated: July 19, 2025 10:01 IST2025-07-19T10:01:13+5:302025-07-19T10:01:54+5:30

नगरपालिका कार्यालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना दोन ठेकेदारांमध्ये झालेली हाणामारीची घटना ही शहरातील राजकीय गुन्हेगारीचाच परिपाक आहे.

Contractors turned gangsters using 'Right to Information' in Ambernath Municiple | ‘माहिती अधिकार’ वापरून गुंड झाले ठेकेदार; अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल, छोट्या रकमेची कामे मिळवून घातला धुडगूस

‘माहिती अधिकार’ वापरून गुंड झाले ठेकेदार; अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल, छोट्या रकमेची कामे मिळवून घातला धुडगूस

- पंकज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क 
अंबरनाथ : गेल्या पाच वर्षांपासून अंबरनाथ नगरपालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीत तयार झालेल्या नव्या ठेकेदारांनी गुंडगिरीला पोसण्याचे काम केले. माहिती अधिकारात अधिकाऱ्यांविरुद्ध माहिती मागवून त्यांना ब्लॅकमेल करायचे व त्यानंतर ठेकेदार बनून नगरपालिकेची कामे मिळवायची, अशी कार्यशैली अंमलात आणून काही गुन्हेगारांचा ठेकेदार म्हणून पालिकेत वावर सुरू होता. अंबरनाथ पालिकेत गुरुवारी दोन ठेकेदारांमध्ये झालेल्या फ्री स्टाइल हाणामारीने हे धक्कादायक वास्तव उघड झाले व पालिकेची प्रतिमा मलिन झाली.

नगरपालिका कार्यालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना दोन ठेकेदारांमध्ये झालेली हाणामारीची घटना ही शहरातील राजकीय गुन्हेगारीचाच परिपाक आहे. याआधी अंबरनाथ पालिकेमध्ये राजकीय वादातून अनेक हत्या घडल्या आहेत. अंबरनाथ शहराला रक्तरंजित राजकीय इतिहास असून, आता नगरपालिकेतील ठेकेदारी हादेखील रक्तरंजित इतिहासाचा भाग झाला आहे. कामे मिळविण्यासाठी एखाद्या ठेकेदाराची हत्या झाली तर कोणालाही नवल वाटणार नाही. 

पुढाऱ्यांचे हस्तक कमाईसाठी सरसावले
प्रशासकीय राजवटीमध्ये अंबरनाथ नगरपालिकेत अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी ठेकेदार म्हणून मिरवू लागले आहेत. ठेकेदार झाल्यावर खूप पैशांची कमाई होते, या आशेवर प्रत्येकजण पालिकेत कोणत्या ना कोणत्या मार्गाने काम मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.  राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक आता ठेकेदारीतून पैसे कमविण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यातील काही राजकीय पुढारी स्वतः माहितीच्या अधिकाराचा वापर करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम करीत आहेत. अंबरनाथ पालिकेत आरटीआय टाकून अधिकाऱ्यांना कोंडीत पकडून त्यांच्याकडून कामे मिळवण्याचे प्रकार सुरू आहेत. 

दादागिरी करून फाइल करतात मंजूर
अंबरनाथ पालिकेत लहान-मोठ्या कामांसाठी आठ ते दहा लाखांच्या फाइल बनवून त्या परस्पर लाटण्याचे काम सुरू आहे. छोट्या रकमेच्या फाइलचा मोठ्या प्रमाणात वाढला असून, दादागिरी करून त्या फाइल मंजूर करून घेतल्या जात आहेत. अंबरनाथ पालिकेच्या कार्यालयांमध्ये ब्लॅकमेलिंग करणारे गावगुंड उघडपणे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून दादागिरी करीत आहेत. 
अधिकाऱ्यांना चुकांमध्ये पकडून त्यांच्याकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत अंबरनाथ पालिकेत ठेकेदारांची संख्या वाढल्यामुळे आता पालिकेच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे  अवघड जात आहे. काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना ठेकेदारांची मुजोरी असह्य झाली आहे.

Web Title: Contractors turned gangsters using 'Right to Information' in Ambernath Municiple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.