पुढच्या वर्षी लवकर या...; दिड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप, कल्याण डोंबिवलीत १२ हजार ६०२ गणपतींचे विसर्जन
By प्रशांत माने | Updated: September 1, 2022 22:30 IST2022-09-01T22:29:28+5:302022-09-01T22:30:21+5:30
काल ठिकठिकाणी गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांकडून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

पुढच्या वर्षी लवकर या...; दिड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप, कल्याण डोंबिवलीत १२ हजार ६०२ गणपतींचे विसर्जन
कल्याण- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जल्लोषात, ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कल्याण डोंबिवलीत दिड दिवसांच्या १२ हजार ६०२ गणपतींना आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. यात १२ हजार ५९५ घरगुती गणपतींसह आणि ७ सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचा समावेश होता. सार्वजनिक मंडळांसह काही घरगुती गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुका शहरांसह ग्रामीण भागात काढण्यात आल्या होत्या. गणोश विसर्जनाच्या निमित्ताने विसर्जन स्थळ देखील फुलून गेली होती.
काल ठिकठिकाणी गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांकडून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरया चा जयघोष, गणेश भक्तांचा उत्साह अशा उत्सवी वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन मोठया उत्साहात झाले. गेली दोन वर्षे कोरोनामुळे प्रादुर्भाव रोखण्याच्या निमित्ताने गणेशोत्सव साजरा करताना काही निर्बंध घालण्यात आले होते.
परंतू यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याची प्रचिती आगमना दरम्यान आली. पावसाने सकाळी दांडी मारल्याने गणरायाचे आगमन निर्विघ्न पार पडले. दरम्यान वाजतगाजत आलेल्या दिड दिवसांच्या बाप्पांना आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. बाप्पा चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. कल्याणमध्ये ३२ तर डोंबिवलीत ३७ विसर्जन स्थळे आहेत काही विसर्जन स्थळांसह अन्य ठिकाणी कृत्रिम तलावही उभारण्यात आले होते.
कल्याणमधील दुर्गाडी गणेशघाट विसर्जन स्थळासह, पुर्वेकडील नांदीवली, चिंचपाडा तलाव डोंबिवलीतील चोळेगाव तलाव, खंबाळपाडा तलाव तसेच रेतीबंदर खाडी, कोपरगाव, जुनी डोंबिवली येथील खाडीतही दिड दिवसांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन पार पडले. प्रत्येक प्रभागातील सहाय्यक आयुक्त विसर्जनाच्या वेळी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जातीने लक्ष घालीत होते. गेल्या काही वर्षापासून केडीएमसीकडून सुरू केलेला ‘विसर्जन आपल्या दारी’ हा उपक्रम यंदाच्या वर्षी देखील राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मोठया ट्रकमध्ये 3 हजार लिटर पाण्याची टाकी बसवून कल्याण डोंबिवली प्रभागांमधील मुख्य चौकात घरगुती शगणपती विसर्जनासाठी फिरविण्यात आली, याचा लाभ गणेश भक्तांकडून घेण्यात आला. या व्यतिरिक्त ‘विसर्जन ऑन कॉल’ ही अभिनव संकल्पना देखील यावर्षी राबविण्यात आली. विसर्जन झालेल्या गणपतींमध्ये कल्याण मधील ४ हजार ५ तर डोंबिवली शहरातील ८ हजार ५९७ घरगुती आणि सार्वजनिक गणोश मंडळांच्या गणपतींचा समावेश होता. विसर्जन स्थळी पोलीस बंदोबस्तासह, अग्नीशमन दलाचे जवान, जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन स्थळावर जाणा-या मार्गावरील वाहतूकीत बदल देखील केले होते.