कल्याण: केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवारांनी केला होता. त्यानंतर भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांच्या पतीवर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्या अटकेनंतर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. शिंदे सेनेच्या दोन्ही उमेदवारांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणावर भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवली चे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले, खरेतर अशा घटना होणे योग्य नाही. येत्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना आळा घालणं गरजेचं आहे. चव्हाण यांनी आज स. वा. जोशी विद्यालयात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
नेमकं प्रकरण काय?पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिंदेसेनेची युती आहे. मात्र, प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार रविवारी आमनेसामने आले. भाजपचे पदाधिकारी पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदेसेनेच्या उमेदवाराने केला. तो भाजपने फेटाळून लावला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारच्या रात्री भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर प्रचार आटोपून घरी जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
भाजप आणि शिंदेसेनेत हाणामारी झाली. रामनगर पोलिसांनी शिंदेसेनेचे उमेद्वार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भाजपने शिंदेसेनेच्या उमेदवारांना अटक करण्याची मागणी करीत मूक मोर्चा काढला होता. मात्र, शिंदेसेनेचे उमेदवार रती पाटील, नितीन पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिस रवी पाटील आणि नितीन पाटील यांना अटक करण्यासाठी मंगळवारी रात्री रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक करण्यात येऊ नये, या मागणीसाठी शिंदेसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.