पाणी समस्येने त्रस्त नागरिकांची केडीएमसी मुख्यालयात धाव
By मुरलीधर भवार | Updated: June 12, 2023 20:10 IST2023-06-12T20:10:02+5:302023-06-12T20:10:48+5:30
मुख्यालयात धाव घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

पाणी समस्येने त्रस्त नागरिकांची केडीएमसी मुख्यालयात धाव
कल्याण : जून उजाडून १२ दिवस झाले तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यातच पाणी येत नसल्याने कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा, ठाणकरपाडा परिसरातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त आहेत. नळाला पाणीच येत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी शिवसेना उपशहरप्रमुख मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
बेतूरकरपाडा परिसरातील साईबाबानगर परिसरातील साईराज सोसायटी, ठाणकर पाडा परिसरातील औदुंबर आळी येथील शिवप्रेरणा मित्रमंडळ यासह इतर परिसरातील नागरिकांच्या घरी पाणी येत नसून पाणी आले तरी दूषित पाणीपुरवठा होत आहे. पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही समस्या सुटत नसल्याने अखेर येथील महिला वर्ग आणि इतर नागरिकांनी पालिका मुख्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन या नागरिकांना दिले. दोनच दिवसांपूर्वी उगले यांनी पाणीपुरवठा अभियंत्याच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतरही समस्या सुटलेली नाही.