चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 06:13 IST2025-12-20T06:13:09+5:302025-12-20T06:13:29+5:30
राष्ट्र, राज्य, आपला जिल्हा,शहर पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल्याप्रमाणे १५ जानेवारी रोजी कमळालाच मतदान करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.

चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
डोंबिवली : राष्ट्र, राज्य, आपला जिल्हा,शहर पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल्याप्रमाणे १५ जानेवारी रोजी कमळालाच मतदान करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी डोंबिवलीत केले. भाजपने भागशाळा मैदानात आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. दरम्यान, संपूर्ण भाषणात महायुती हा शब्द चव्हाण यांनी वापरला नाही, याची यावेळी चर्चा होती.
कोणत्याही शेठगिरीला बळी पडू नका, असे सांगून चव्हाण यांनी मी हा शब्द आवर्जून वापरला आहे, हे लक्षात घ्या, असे म्हणाले. सामान्य नागरिकांसाठी स्वतःच्या कारची काच खाली न करणाऱ्यांना लक्षात ठेवायचे की, जो चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे, त्या रवींद्र चव्हाण यांस लक्षात ठेवायचे, हे नागरिकांनी ठरवावे. एकदा आम्हाला मतदान करा, पुढील पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, रविवारी फडके रोडवर पूर्वेकडील मंडळाचा मेळावा आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर पक्षाचे माजी नगरसेवक, नगरसेविका, जिल्हाध्यक्ष नंदू परब आदींची उपस्थिती होती. मेळाव्याचे सूत्रसंचालन भाजपचे अनुसूचित जाती-जमातीचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी केले.
महापौरपदी पारदर्शक नेता हवा
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी पारदर्शक नेता हवा, कोणताही शेठ नको, असा टोला चव्हाण यांनी लगावला. डोंबिवली पश्चिमेला मेळावा होता व त्या परिसरात नावापुढे 'शेठ' लावणारे अनेकजण राहतात. त्यांना उद्देशून चव्हाण यांनी टोला दिल्याची चर्चा आहे. चव्हाण यांच्या या उल्लेखावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.