लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेने ५३ आणि भाजपने ५० जागा जिंकल्या असल्या तरी शिंदेसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. महायुती म्हणून पुढे जाताना या बाबीचाही प्रामुख्याने विचार करायला हवा, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.
महापालिकेत शिंदेसेना आणि भाजप यांची युती होती. भाजपने ५४ जागा लढविल्या आणि ५० जागा जिंकल्या. हा स्ट्राईक रेट ९२.६ टक्के इतका आहे. शिंदेसेनेने ६५ जागा लढविल्या आणि ५३ जिंकल्या. हा स्ट्राईक रेट ८१.५ टक्के इतका आहे. शिंदेसेनेने तुलनेने अधिक जागा लढविल्या पण टक्केवारीचा विचार केला तर भाजपपेक्षा त्यांच्या जिंकलेल्या जागांचे प्रमाण कमी आहे. युतीमध्ये शिंदेसेनेपेक्षा भाजपच्या वाट्याला ११ जागा कमी आलेल्या होत्या. मात्र योग्य उमेदवारांची निवड, प्रचार संसाधनांचा योग्य वापर आणि मतदारांशी संपर्क यातून आम्ही चांगले यश मिळविले, अशी भावना भाजपचे स्थानिक नेते व्यक्त करत आहेत.
दोन पक्ष युती करून लढत असतील तर एक पक्ष तुलनेने अधिक जागा लढणार आणि दुसरा पक्ष कमी जागा लढणार हे अपेक्षितच असते. मात्र, मिळालेल्या यशाच्या आधारे पुढील सत्ताकेंद्रांचे वाटप युतीमध्ये करायचे असेल तर स्ट्राईक रेट हा निकष प्राधान्याने विचारात घेतला पाहिजे अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. स्ट्राईक रेट अधिक राखलेल्या पक्षाला सत्तेत कमी वाटा दिला गेला तर ते लोकांनी दिलेल्या कौलाशी विसंगत असेल.
याच आधारावर कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तेतील पदे निश्चित करताना आपण भूमिका घ्यावी, अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. युतीधर्माचा सन्मान राखत आपण युतीमध्ये लढलो, तसे केले नसते आणि स्वबळावर लढलो असतो तर अधिक चांगले यश मिळाले असते असेही त्यांचे म्हणणे आहे.
Web Summary : Despite fewer seats, BJP boasts a higher strike rate than Shinde's Sena in Kalyan-Dombivli. Local BJP leaders advocate for power-sharing based on this success metric, urging equitable distribution of positions within the coalition, as reported to Ravindra Chavan.
Web Summary : कल्याण-डोंबिवली में कम सीटें होने के बावजूद, बीजेपी का स्ट्राइक रेट शिंदे सेना से अधिक है। स्थानीय बीजेपी नेता इस सफलता दर के आधार पर सत्ता में हिस्सेदारी की वकालत करते हैं और गठबंधन के भीतर पदों के समान वितरण का आग्रह करते हैं, जैसा कि रवींद्र चव्हाण को बताया गया।