भाजपचा नवा शॉर्टकट; वेळेत सभा सुरू करा, तासाभरात भाषणे संपवा, सभेपेक्षा पाण्याच्या वेळेचीच काळजी
By अनिकेत घमंडी | Updated: December 23, 2025 09:42 IST2025-12-23T09:41:55+5:302025-12-23T09:42:11+5:30
प्रचारासाठी काय काय करावे लागते?

भाजपचा नवा शॉर्टकट; वेळेत सभा सुरू करा, तासाभरात भाषणे संपवा, सभेपेक्षा पाण्याच्या वेळेचीच काळजी
- अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पालिका निवडणुकीनिमित्त होणाऱ्या सभांमुळे गृहिणींची पाण्याची वेळ चुकणार नाही, त्यांची चुळबुळ सुरू होणार नाही, याची काळजी घेऊन जेमतेम तासाभरात सभा संपवण्याचे नियोजन भाजपने केले आहे. मात्र दुसरीकडे शिंदेसेनेच्या सभा, मेळावे हे वेळेवर सुरू होत नाहीत. तसेच ते वेळेचे बंधन पाळत नसल्याने अनेकदा घरातील पाणी भरण्याची वेळ चुकते व कुटुंबाला निर्जळी करावी लागते.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागताच शुक्रवारपासून भाजपने कल्याण-डोंबिवलीमध्ये मंडल स्तरावर जाहीर कार्यकर्ता संवाद मेळावे घेतले. त्यामध्ये कल्याण, डोंबिवली या शहरातील पूर्व, पश्चिम अशी पक्षाची मंडल रचना असल्याने व्यासपीठावर त्या भागातील इच्छुक, प्रमुख पदाधिकारी, निवडक ज्येष्ठ नेतेमंडळी आणि प्रमुख वक्ते यांनाच स्थान दिले होते.
..अशी होती रचना
सभेची वेळ ५:३० असल्याने मुख्य मार्गदर्शक भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे वेळेत सभास्थानी पोहोचले होते. त्यामुळे चव्हाण आल्याची चर्चा संपूर्ण परिसरात पोहोचताच अन्य पदाधिकाऱ्यांवर वेळेतच येण्याचे बंधन आपोआप आले. आतापर्यंतच्या तीनही जाहीर सभा घोषित केलेल्या वेळेत आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या. त्यामुळे उपस्थित पदाधिकारी, शहरातील अन्य नागरिक, पोलिस यंत्रणा यांसह वाहतूक पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
केवळ तीन जणांची भाषणे
सभास्थानी कोणाही इच्छुक उमेदवारांची भाषणबाजी नव्हती. केवळ तीन जणांची आटोपशीर भाषणे झाली. डोंबिवलीच्या सभांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याणमध्ये नरेंद्र पवार, पाटील आणि सर्व ठिकाणी मुख्य भाषण रवींद्र चव्हाण यांचे होते. पाटील, पवार यांना प्रत्येकी ५ मिनिटे, स्वतः चव्हाण १८ ते २० मिनिटे त्या आधीच्या अर्ध्या तासात सत्कार, जल्लोष असे शिस्तबद्ध नियोजन होते.
आणि पाणी भरण्याची वेळ चुकली
भाजपप्रमाणेच शिंदेसेनेचे रविवारी कल्याण आणि उल्हासनगर येथे मेळावे झाले. मात्र त्या सभांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण नियोजित वेळेच्या अडीच ते तीन तास विलंबाने झाल्याची तक्रार उपस्थितांनी केली. उपस्थितांसमोर कल्याण, डोंबिवलीमधील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, उपशहरप्रमुख, तालुकाप्रमुख आदींसह विविध मंडळींची भाषणे झाली. शिंदे यांचे भाषण ऐकून घरी गेलेल्या लाडक्या बहिणींना आपली पाणी भरण्याची वेळ चुकल्याची जाणीव झाली.