कल्याणवासीयांना नितीन गडकरींकडून मोठं गिफ्ट, कपिल पाटील यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 18:36 IST2021-08-05T18:35:10+5:302021-08-05T18:36:12+5:30
कल्याणजवळील शहाड रस्त्यावर असलेल्या ओव्हरब्रीज मोठा करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

कल्याणवासीयांना नितीन गडकरींकडून मोठं गिफ्ट, कपिल पाटील यांनी दिली माहिती
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विविध निर्णय घेतले आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.
कल्याणजवळील शहाड रस्त्यावर असलेल्या ओव्हरब्रीज मोठा करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसेच, वरप-कांबा ते माळशेज घाट रस्ता चौपदरी करण्यासाठी जमीन अधिग्रहणाचे आदेश, शीळफाटा-बदलापूर-म्हसा-माळशेज घाट रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक व गार्डन बांधण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचा आदेशही मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
माळशेज घाटात नवीन बोगदा तयार करण्यासाठी दोन हजार ४७८ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही देण्यात आले. या बैठकीला केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार किसन कथोरे यांची उपस्थिती होती.