किरकोळ वादातून रिक्षा संघटनेच्या पदाधिका-यावर हल्ल्याचा प्रयत्न
By प्रशांत माने | Updated: February 1, 2024 18:04 IST2024-02-01T18:04:01+5:302024-02-01T18:04:15+5:30
चाकू दगडाचा वापर; रिक्षाचालक पसार.

किरकोळ वादातून रिक्षा संघटनेच्या पदाधिका-यावर हल्ल्याचा प्रयत्न
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: येथील पश्चिमेकडील उमेशनगर परिसरात बुधवारी रात्री एका रिक्षाचालकाने रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी असलेल्या शेखर जोशी यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालक पसार झाला असून याप्रकरणी जोशी यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रिक्षाच्या मिळालेल्या क्रमांकावरून पोलिस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.
जोशी उमेशनगरमधील तोंडवळकर विदयालयासमोरील चहाच्या टपरीवर चहा पित होते. त्यांची दुचाकी टपरीच्या समोर उभी होती. चहा पिऊन झाल्यावर त्यांच्या दुचाकीसमोर उभी असलेली रिक्षा दुचाकी काढेपर्यंत थोडी बाजुला घे असे जोशी यांनी संबंधित रिक्षाचालकाला सांगितले. याचा राग रिक्षाचालकाला आला. रस्ता तुमच्या बापाचा आहे का. रिक्षा जागेवरून काढणार नाही अशी अरेरावीची भाषा बोलत रिक्षाचालकाने जोशी यांच्याशी वाद घातला. तो एवढयावरच नाही थांबला त्याने रिक्षात ठेवलेला चाकू आणला आणि दुस-या हातात दगड घेऊन तो जोशी यांच्या डोक्यात टाकण्याच्या प्रयत्नात होता. परंतू टपरी जवळील काही नागरिक मध्ये पडल्याने मोठा अनर्थ टळला.