खडवलीत २८ वीजचोरांना कारवाईचा झटका १९ लाख ६४ हजारांची वीजचोरी उघड; गुन्हे दाखल
By अनिकेत घमंडी | Updated: November 10, 2022 17:37 IST2022-11-10T17:37:11+5:302022-11-10T17:37:19+5:30
महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई निरंतरपणे सुरू आहे.

खडवलीत २८ वीजचोरांना कारवाईचा झटका १९ लाख ६४ हजारांची वीजचोरी उघड; गुन्हे दाखल
डोंबिवली: महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई निरंतरपणे सुरू आहे. उपविभागातील खडवली शाखा कार्यालयांतर्गत २८ जणांविरुद्ध १९ लाख ६४ हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ अन्वये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडवली शाखा कार्यालयांतर्गत शिवाजी चौक व स्वामी समर्थ मंदीर परिसर, एकता चाळ, जांभूळपाडा, खारपे चाळ, खडवली पूर्व व पश्चिम, राये रोड आदी भागात महावितरणच्या पथकाने ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली. यात २८ जणांकडून वीज मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करून परस्पर वीज वापर सुरू असल्याचे आढळून आले. वीज चोरीचे देयक व दंडाची रक्कम विहित मुदतीत भरली नसल्याने या सर्वांविरुद्ध कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता गणेश पवार, कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे व त्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.