डोंबिवली स्थानकात एसी ट्रेनला तुफान गर्दी, दरवाजे बंद न झाल्याने एसी लोकल रखडली, लटकणाऱ्यांना पोलिसांनी हाताला धरून उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:40 IST2025-06-11T12:39:12+5:302025-06-11T12:40:16+5:30
Mumbai Suburban Railway: मुंब्रा येथील सोमवारच्या दुर्घटनेनंतर डोंबिवली व अन्य स्थानकावरील प्रवाशांनी मंगळवारी सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे बंद असलेल्या एसी लोकलमधून प्रवास करण्याला पसंती दिली. विशेष म्हणजे एसी लोकलमध्ये प्रवाशांची इतकी गर्दी झाली की, तब्बल १० ते १५ मिनिटे एसी लोकलचे दरवाजे बंदच होऊ शकले नाहीत

डोंबिवली स्थानकात एसी ट्रेनला तुफान गर्दी, दरवाजे बंद न झाल्याने एसी लोकल रखडली, लटकणाऱ्यांना पोलिसांनी हाताला धरून उतरवले
डोंबिवली - मुंब्रा येथील सोमवारच्या दुर्घटनेनंतर डोंबिवली व अन्य स्थानकावरील प्रवाशांनी मंगळवारी सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे बंद असलेल्या एसी लोकलमधून प्रवास करण्याला पसंती दिली. विशेष म्हणजे एसी लोकलमध्ये प्रवाशांची इतकी गर्दी झाली की, तब्बल १० ते १५ मिनिटे एसी लोकलचे दरवाजे बंदच होऊ शकले नाहीत आणि तेवढा वेळ लोकल जागची हलली नाही. डोंबिवली स्थानकात घडलेली ही घटना दरवाजे बंद करण्याच्या फुशारक्या मारणाऱ्या मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.
डोंबिवली स्थानकात सकाळी ८:५९ ची एसी लोकल धिम्या फलाटावर आली. त्यात आधीच प्रचंड गर्दी होती. रोज त्याच गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना चढता आले नाही, इतकी तुफान गर्दी मंगळवारी या लोकलला झाली. जे गाडीत चढले ते दरवाजात अडकल्याने दरवाजे बंदच झाले नाहीत. अखेर रेेल्वे पोलिसांनी दरवाजाजवळ येऊन काही प्रवाशांना अक्षरश: हाताला धरून खाली उतरवले. त्यामुळे ही लोकल डोंबिवली स्थानकात जवळपास १० मिनिटे रखडली. दरवाजे बंद झाल्यानंतर अखेर ९:०९ मिनिटांनी ही लोकल मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली.
मागील अनेक वर्षांपासून गर्दी कमी करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवा, एसी लोकलच्या फेऱ्या वाढवा, अशी मागणी प्रवाशी संघटनांकडून केली जात आहे. मात्र, रेल्वेकडून कधी प्रवासी संख्या कमी झाल्याचे, तर कधी कार्यालयाच्या वेळा बदलून गर्दी कमी करण्याचे सल्ले प्रवाशांना दिले गेले. मुंब्रा येथे सोमवारी प्रवाशांच्या पाठीवरील बॅगेचा धक्का लागून अपघात होऊन प्रवासी मरण पावल्याने पाठीवर मोठ्या सॅक घेऊन प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी गर्दीतून धोकादायक प्रवास टाळण्यासाठी मंगळवारी एसी लोकलला पसंती दिली. एसी लोकल दर एक तासाला सोडली जाते. त्यातही एसी लोकल अनेकदा अर्धा तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांना साध्या लोकलमधून लटकत प्रवास करतात. वाढत्या गर्दीमुळे एसी लोकलचा दरवाजा बंद न होणे, कधी दरवाजा उघडत नसल्याच्या तक्रारी प्रवाशाकडून केल्या जातात.