कचऱ्यासोबत आलेला दीड तोळ्याचा हार सफाई कर्मचाऱ्याने केला परत; प्रामाणिकपणाचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 07:12 IST2025-10-24T07:11:50+5:302025-10-24T07:12:52+5:30
सफाई कामगारांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.

कचऱ्यासोबत आलेला दीड तोळ्याचा हार सफाई कर्मचाऱ्याने केला परत; प्रामाणिकपणाचे कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : सोन्याच्या किमती एकीकडे दिवसागणिक नवनवीन उच्चांक गाठत असताना दुसरीकडे कचऱ्याच्या पिशवीमध्ये कचऱ्यासोबत चुकून दीड तोळ्याचा सोन्याचा हार टाकल्याचा प्रकार कल्याण पूर्वेत उघड झाला. मात्र सफाई कर्मचाऱ्याने कोणताही मोह न ठेवता संबंधित महिलेला महागड्या सोन्याचा हार परत केला. केडीएमसी आणि सुमित कंपनीच्या सफाई कामगारांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.
केडीएमसीच्या सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळीही कल्याण पूर्वेच्या विविध भागांतून कचरा संकलनाचे काम सुरू होते. कल्याण पूर्वेतील इमारती आणि चाळीच्या परिसरातून गोळा झालेला हा सर्व कचरा कचोरे टेकडीवरील इंटरकटिंग केंद्रावर पाठवण्याचे काम सुरू होते. त्यादरम्यान सकाळी आलेल्या कर्मचाऱ्यांना महिलेने कचऱ्याची पिशवी दिली. नजरचुकीने त्यात सोन्याचा दीड तोळ्याचा हारही गेला होता. हार कचऱ्यात गेल्याची माहिती सुमित कंपनीचे ४ जे प्रभागाचे अधिकारी समीर खाडे यांना केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव यांनी सांगितली. त्यानुसार कचरा संकलनासाठी गेलेल्या संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना खाडे यांनी सोन्याच्या हाराबाबत सांगितले आणि संकलित केलेली कचरागाडी कचोरे टेकडीवरील इंटरकटिंग केंद्रावर नेण्याच्या सूचना दिल्या. त्या ठिकाणी महिलेलाही बोलावण्यात आले. तिच्यासमाेर गाडीतील कचरा वेगळा करण्यात आला आणि त्यात हार आढळून आला.
खऱ्या अर्थाने दिवाळी गाेड
दीड तोळ्याचा हार चुकून कचऱ्यात गेल्याचे लक्षात आल्यावर महिला हादरली होती. हार मिळाला नाहीतर काय होईल, या चिंतेने महिलेला काहीच सुचत नव्हते. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या व कचरा कंत्राटदार कर्मचाऱ्यांमुळे हार पुन्हा मिळाला अन् महिलेची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाल्याची चर्चा परिसरात सुरू होती.