आगरी महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा; बदलापूरकरांनी घेतला आस्वाद
By पंकज पाटील | Updated: December 23, 2023 18:48 IST2023-12-23T18:48:24+5:302023-12-23T18:48:42+5:30
पहिल्याच दिवशी लोकगीतांचा साऱ्यांना नजराणा

आगरी महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा; बदलापूरकरांनी घेतला आस्वाद
पंकज पाटील, बदलापूर: बदलापूरमध्ये शुक्रवारी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत आगरी मोहोत्सवाला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने वारकऱ्यांनी हरी नामाचा गजर करीत हातात भागवत धर्माची पताका घेऊन आपल्या वारकरी परंपरेंच दर्शन घडवले. त्यानंतर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
वामनम्हात्रे फाउंडेशन आयोजित या आगरी महोत्सवात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांच्या कॉमेडी तडक्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी अर्थात दादूस आणि श्रीकांत नारायण यांच्या धमाल कोळी गीतांमुळे प्रेक्षकांना संगीताच्या तालावर ठेका धरण्याचा मोह काही आवरता आला नाही. तसेच या आगरी महोत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवलेले खाद्यपदार्थ, तसेच तरुणाईच्या जिभेचे चोचले पुरवणारे चायनीज खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या स्टोलवर खाद्य प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. तरुणांसाठी आकाश पाळणे तर लहान मुलांसाठी विविध खेळ असल्याने या महोत्सवाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू होती. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बदलापूर आणि अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉक्टर बालाजी किनिकर यांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आणि त्यानंतर संगीताचा बहारदार कार्यक्रम सुरू झाला.