व्यवसायावर झाला ७० टक्के परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:52 IST2020-12-14T00:52:09+5:302020-12-14T00:52:13+5:30
गेल्या महिन्याभरातील जीम व्यवसायावर नजर टाकल्यास जीम चालकांना अपेक्षित असा फायदा झालेला नाही, तसेच व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाणही कमीच आहे.

व्यवसायावर झाला ७० टक्के परिणाम
- मुरलीधर भवार
कल्याण : लॉकडाऊनमध्ये जीम बंद होते. अनलॉकमध्ये सगळे व्यवहार सुरू होत असताना, सरकारी यंत्रणांनी केवळ मोकळ्या जागेत व्यायामाला मुभा दिली होती. जीम चालविणाऱ्या अनेक संस्थांनी विविध राजकीय मंडळींकडे धाव घेतल्यावर, अनलॉकनंतर जीम सुरू झाले. गेल्या महिन्याभरातील जीम व्यवसायावर नजर टाकल्यास जीम चालकांना अपेक्षित असा फायदा झालेला नाही, तसेच व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाणही कमीच आहे. कारण अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही. व्यायाम करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये काही प्रमाणात अद्याप कोरोनाची भीती कायम आहे. यामुळे व्यवसायावर ७० टक्के परिणाण झाल्याचे निरीक्षण जीम चालक, संचालकांनी व्यक्त केले आहे.
कल्याण पश्चिमेला बेतूरकर पाडा येथे गेली नऊ वर्षे जीमचा व्यवसाय करणारे जीम चालक अजिंक्य पै यांनी सांगितले की, त्यांच्या जीमची जागा तीन हजार चौरस फुटांची आहे. या जीममध्ये व्यायामाला लागणारे जवळपास २० प्रकारचे साहित्य आहे. जीममध्ये व्यायाम करणाऱ्यांसाठी प्रत्येकी एक तासाची बॅच केली आहे. प्रत्येक साहित्यात सहा फुटांचे अंतर ठेवले आहे. जीममध्ये प्रत्येकाला प्रवेश देण्यापूर्वी सॅनिटाझर दिले जाते, तसेच त्याला दोन नॅपकिन दिले जातात. एक नॅपकिन घाम पुसण्यासाठी दिला जातो, तर एक नॅपकिन मशीनवर टाकला जातो, जेणेकरून घाम मशीनला लागू नये. तासाभराच्या बॅचनंतर प्रत्येक मशीन सॅनिटाइझ केली जाते. नियम पाळून व्यायाम करणाऱ्यांची काळजी घेतली जाते, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कुणालाही होऊ नये. जीममध्ये प्रवेश करताना मास्क लावणे योग्य आहे. मात्र, मास्क लावून व्यायाम करणे शक्य नाही. प्रत्येक बॅच एका तासाची असल्याने मर्यादा आलेल्या आहेत. कारण प्रत्येकांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्य़ा आहेत. एरवी प्रत्येकाला अनुकूल असलेल्या वेळेनुसार जीममध्ये येत होते. अनलॉकनंतरच्या नियमावलीचा फटका व्यवसायाला बसला आहे. केवळ ३० टक्केच ग्राहक जीमकडे सध्या आहेत.
देखभाल खर्च वाढला
जीम संघटनांनी ग्राहकांची फी वाढवू नका, असे सांगितले असले, तरी सॅनिटायझर, नॅपकिनचा खर्च पाहता, देखभाल दुरुस्ती असा एकूणच खर्च वाढला असल्याने केवळ पाचशे रुपयांची वाढ केली आहे. कोरोना काळात किमान ७ लाख रुपयांचा फटका मला बसला असल्याचे पै यांनी सांगितले.