PKL 2019: U Mumba beat Puneri Paltan by 33-23 margin of first home match  | PKL 2019 : यू मुंबाची घरच्या मैदानावर विजयी सलामी; महाराष्ट्रीय डर्बीत पुण्यावर मात 

PKL 2019 : यू मुंबाची घरच्या मैदानावर विजयी सलामी; महाराष्ट्रीय डर्बीत पुण्यावर मात 

मुंबई, यू मुंबा वि. पुणेरी पलटन : यू मुंबाने होम लेगमध्ये पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. यू मुंबा आणि पुणेरी पलटन या महाराष्ट्रीय डर्बीत यजमानांनी ३३-२३ अशी सहज बाजी मारली. दुसऱ्या सत्रात दोन लोण खाल्यानंतर पुण्याने पराभव मान्य केला. 

सुरिंदर सिंग आणि फझल अत्राचली यांच्या पकडींनी पहिले सत्र गाजवला. सुरुवातीच्या काही मिनिटात २-५ अशा पिछाडीवर पडलेल्या यू मुंबाने नंतर मुसंडी मारली. आज दोन्ही संघांनी आपापले बचाव क्षेत्र भक्कम केले होते. त्यामुळे दोन्ही संघांच्या चढाईपटूंना फार गुण घेता आले नाही. यू मुंबाने पकडीत ७ गुण घेतले,तर पुणेरी पलटनला ६ गुण घेता आले. चढाईतही यू मुंबा ४-३ असा वरचढ ठरला. त्यामुळे यू मुंबाने पहिल्या सत्रात ११-९ अशी आघाडी घेतली. 

दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच मिनिटाला यू मुंबाने लोण चढवला आणि १५-१० अशी आघाडी घेतली. या धक्क्यानंतर पुण्याच्या खेळाडूंचा ढिसाळ खेळ पाहायला मिळाला. यजमान मुंबईने एकेक गुण घेत आघाडी वाढवत नेली. मुंबाच्या अभिषेक सिंगने पुण्याच्या बचाव भेदला. त्यात अर्जुन देश्वालने एकाच चढाईत तीन गुण घेतले. त्यानंतर आणखी एक लोण चढवत अखेरच्या ८ मिनिटापर्यंत यू मुंबाने २७-१७  अशी आघाडी घेतली होती. 

सुशांत सैलने अखेरच्या पाच मिनिटांत चढाईत गुण घेत पुण्याच्या चमूत विजयाची आस निर्माण केली. पण, संदीप नरवालने त्याची सूपर टॅकल करून मुंबाची आघाडी ३०-२१ अशी आणखी भक्कम केली. त्यानंतर यू मुंबाने मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी हा सामना सहज जिंकला. यू मुंबाकडून अभिषेक सिंग, रोहित बलियान, सुरींदर सिंग, संदीप नरवाल आणि फैझल अत्राचली यांनी चढाई व पकडीत दमदार खेळ केला. पुण्याकडून सुरजीत सिंग, पवन कॅडियन, संकेत सावंत यांचा संघर्ष अपयशी ठरला. 

Web Title: PKL 2019: U Mumba beat Puneri Paltan by 33-23 margin of first home match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.