Kabaddi: sankalpa and sangharsha team won their first matches | कबड्डी : संकल्प, संघर्ष संघांची विजयी सलामी
कबड्डी : संकल्प, संघर्ष संघांची विजयी सलामी

मुंबई : संकल्प, संघर्ष या संघांनी मी मुंबईकर क्रीडा मंडळ आयोजित प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेत पुरुषांत दुसरी फेरी गाठली. घाटकोपर(प.) येथील कांतीलाल मगनलाल शहा क्रीडांगणावर सुरू असलेल्या सामन्यात संकल्पने मध्यांतरातील ०७-१४अशा ७गुणांच्या पिछाडीवरून माता महाकालीचा विरोध २६-२२ असा मोडून काढला. ऋषिकेश म्हामूणकरने आक्रमक सुरुवात करीत संकल्पवर लोण देत संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात अशोक चव्हाणने जोरदार प्रतिकार करीत या लोणची परतफेड करीत सामना आपल्या बाजूने झुकविला. दुसऱ्या सामन्यात देखील संघर्षने ०९-१३अशा पिछाडीवरून जोरदार कमबॅक करीत ३५-२२असा विजय साजरा केला. पंकज भोसलेला संघर्ष संघाच्या विजयाचे श्रेय द्यावे लागेल. गुरुकृपाच्या समाधान घागचा शर्थीचा खेळ वाया गेला.

      महिलांच्या सामन्यात नवशक्तीने चेंबूर क्रीडा केंद्राचा प्रतिकार २३-१८असा संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला दोन्ही संघ १०-१०अशा बरोबरीत होते. बेबी जाधव, पूजा ताम्हणकर यांचा खेळ नवशक्तीच्या विजयात महत्वाचा ठरला. पुरुषांच्या द्वितीय श्रेणी गटात जॉलीने गौतम इंगळेच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर शिवाई प्रतिष्ठानला २२-२०असे नमविलें. शिवाईचा विशाल परब छान खेळला. दुसऱ्या सामन्यात अभिनवने श्री साईचा १८-१२ असा पाडाव केला. तर अरुणोदयने स्वराज्यला २२-१५असे रोखले. विजयी संघांनी दुसरी फेरी गाठली.


Web Title: Kabaddi: sankalpa and sangharsha team won their first matches
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.