‘बाहुबली’ सिद्धार्थचा हरियाणाला दणका, तेलगू टायटन्सचा शानदार विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 04:36 IST2019-08-19T04:36:22+5:302019-08-19T04:36:36+5:30
कबड्डीमधील ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ देसाई याने आपल्या लौकिकानुसार तुफानी खेळ करत तेलगू टायटन्सचा शानदार विजय साकारला.

‘बाहुबली’ सिद्धार्थचा हरियाणाला दणका, तेलगू टायटन्सचा शानदार विजय
चेन्नई : कबड्डीमधील ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ देसाई याने आपल्या लौकिकानुसार तुफानी खेळ करत तेलगू टायटन्सचा शानदार विजय साकारला. त्याच्या वेगवान खेळाच्या जोरावर तेलगूने प्रो कबड्डी स्पर्धेत हरियाणा स्टीलर्सचा ४०-२९ असा पराभव केला.
जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सिद्धार्थने तब्बल १८ गुणांची वसूली करत आपला दर्जा दाखवला. त्याच्या धडाकेबाज खेळापुढे हरियाणाच्या सर्वच खेळाडूंची हवा निघाली. मध्यंतराला तलगूने २१-१३ असे वर्चस्व राखले. सिद्धार्थच्या जोरावर तेलगूने हरियाणावर दोन लोण चढवले.
मध्यंतरानंतर तेलगूने आणखी वेगवान खेळ केला. यावेळी हरियाणाने १६ गुण मिळवले, तर तुफानी सिद्धार्थच्या जोरावर तेलगूने आणखी १९ गुणांची भर टाकत दिमाखात बाजी मारली. यानंतर झालेल्या अन्य लढतीत तामिळ थलायवास आणि पुणेरी पलटण यांच्यात ३१-३१ अशी बरोबरी झाली.