बापरे! गर्लफ्रेंडला करायचं होतं इम्प्रेस, Video बनवण्यासाठी 'तो' थेट सिंहांच्या पिंजऱ्यात शिरला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:06 IST2025-01-03T13:05:42+5:302025-01-03T13:06:41+5:30
आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं.

फोटो - Reuters
उज्बेकिस्तानमधील पार्केंट येथील एका प्राणीसंग्रहालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४४ वर्षीय एफ. इरिसकुलोव्हने आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं. यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागला आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, गार्ड असलेल्या इरिसकुलोव्हने रात्रीच्या शिफ्टमध्ये पहाटे ५ वाजता सिंहांच्या पिंजऱ्याचं कुलूप उघडलं. त्याला सिंहांच्या जवळ जाऊन व्हिडीओ रेकॉर्ड करायचा होता, जो तो त्याच्या गर्लफ्रेंडला पाठवणार होता.
सुरुवातीला पिंजऱ्यातील सिंह शांत बसले होते. त्याने 'सिम्बा' नावाच्या एका सिंहाला शांत राहण्यास सांगितलं आणि त्याच्या मानेवरून हात फिरवायला सुरुवात केली. पिंजऱ्याचं गेट उघडं राहिल्याने सिंह बाहेर आले होते. गार्डने या संपूर्ण घटनेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केलं. परंतु काही सेकंदांनंतर सिंहाने त्याच्यावर हल्ला केला. व्हिडिओमध्ये इरिसकुलोव्ह वारंवार सिंहांना 'शांत राहा, शांत राहा' असं म्हणताना ऐकायला येत आहे, परंतु सिंहांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
प्राणीसंग्रहालयातील या गार्डच्या आणि सिंहांचा आवाजही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. रिपोर्टनुसार, सिंहांनी त्याची शिकार केली. हा व्हिडीओ अत्यंत भीषण असल्याचं म्हटलं जात आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या घटनेबाबत एक निवेदन जारी केलं आहे. ते म्हणाले की, १७ डिसेंबर रोजी ताश्कंद प्रदेशातील पार्केंट जिल्ह्यात असलेल्या 'लायन पार्क' या प्राणीसंग्रहालयातील तीन सिंह पिंजऱ्यातून बाहेर आले. या सिंहांनी ४४ वर्षीय गार्डवर हल्ला केला, गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेने प्राणीसंग्रहालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पिंजरा उघडा राहिल्याने सिंह बाहेर आले. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. प्राणीसंग्रहालयाच्या या निर्णयावर अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काहींनी प्राणीसंग्रहालय प्रशासनावर टीका केली आहे. सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.