Saudi Arabia Sand : दूर दूरपर्यंत सोनेरी वाळूच वाळू दिसणारा वाळवंट म्हटला की, राजस्थानसोबत सौदी अरबची देखील आठवण येते. आपल्याला कदाचित कल्पना असेल की, सौदी अरबचा ९५ टक्के भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. म्हणजे सगळीकडे नुसती वाळूच वाळू. अशात इथे बांधकामासाठी वाळू स्वस्त दरात मिळत असेल असंही वाटू शकतं. मात्र, सत्य काही वेगळंच आहे. कधी तुम्ही विचार केलाय का की, ज्या देशाचा 95 टक्के भाग वाळवंटाने भरलेला आहे, तोच देश इतर देशांकडून वाळू खरेदी करतो?
सौदी अरबला जग वाळवंटांचा बादशाह मानतं. पण हाच देश ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडून वाळू आयात करतो. मग प्रश्न पडतो, आजूबाजूला इतकी वाळू असताना बाहेरून वाळू आणण्याची गरज का भासते? सौदी अरबच्या वाळवंटात कधीही न संपणार इतकी वाळू असूनही त्यांना त्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागत आहे. हे धक्कादायक सत्य सोप्या भाषेत समजून घेऊया.
दुसऱ्या देशातून का मागवतात वाळू?
सौदी अरबचा जवळपास 95 टक्के भूभाग वाळवंटाने व्यापलेला आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की, इथे वाळूची कधीच कमतरता भासू शकत नाही. पण वास्तव असं आहे की वाळवंटातील वाळू बांधकामासाठी उपयोगी ठरत नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे वाळूच्या कणांचा आकार. हजारो वर्षे वाऱ्याच्या घर्षणामुळे, वादळांमुळे वाळवंटातील वाळूचे कण गोल आणि गुळगुळीत होतात. असे कण सिमेंटसोबत मजबूत पकड निर्माण करू शकत नाहीत. काँक्रीट तयार करण्यासाठी खडबडीत आणि टोकदार वाळूची गरज असते, जी सिमेंट आणि पाण्यासोबत मिसळून मजबूत रचना तयार करते. त्यामुळेच सौदी अरबमधील स्थानिक वाळू मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये अपयशी ठरते.
Vision 2030 आणि वाढती वाळूची गरज
Vision 2030 अंतर्गत सौदी अरब जगातील काही सर्वात मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. NEOM, The Line, Red Sea Project आणि Qiddiya यांसारख्या प्रकल्पांसाठी कोट्यवधी टन काँक्रीटची आवश्यकता आहे. प्रत्येक टन काँक्रीटसाठी योग्य दर्जाची वाळू अत्यंत महत्त्वाची असते. ही गरज भागवण्यासाठी सौदी अरबने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून सुमारे 1.4 लाख डॉलर्सची बांधकाम दर्जाची वाळू खरेदी केली. OEC नुसार, ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात मोठ्या वाळू निर्यातदारांपैकी एक आहे. त्यामुळेच सौदी अरबसारख्या श्रीमंत आणि वाळवंटी देशालाही बाहेरून वाळू आयात करावी लागत आहे.
समुद्री वाळूला जास्ती मागणी, कारण...
नद्या, समुद्रकिनारे आणि खाणींमधून मिळणारी वाळू पाण्याच्या प्रवाहामुळे खडबडीत आणि कोनीय स्वरूपाची राहते. असे कण काँक्रीटमध्ये सिमेंटसोबत घट्ट बसतात, ज्यामुळे मजबूत इमारती उभ्या राहतात. म्हणूनच Burj Khalifa सारख्या प्रकल्पांमध्येही स्थानिक वाळवंटातील वाळूचा वापर करण्यात आलेला नव्हता. UNEP च्या 2024 च्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 50 अब्ज टन वाळूचा वापर केला जातो, ज्यामुळे ‘सँड क्रायसिस’ अधिक गंभीर होत आहे. सौदी अरब आता रिसायकल्ड साहित्य आणि सिंथेटिक वाळूवरही काम करत आहे, पण सध्या तरी मेगा प्रकल्पांसाठी आयात हाच सर्वात मोठा आधार ठरत आहे.
Web Summary : Saudi Arabia imports sand because desert sand is unsuitable for construction. Its grains are too smooth. The country needs rougher sand for its mega-projects like NEOM, relying on imports from countries like Australia to meet the demand.
Web Summary : सऊदी अरब रेत का आयात करता है क्योंकि रेगिस्तानी रेत निर्माण के लिए अनुपयुक्त है। इसके कण बहुत चिकने होते हैं। देश को NEOM जैसी अपनी मेगा-परियोजनाओं के लिए खुरदरी रेत की आवश्यकता है, जिसके लिए ऑस्ट्रेलिया जैसे देशों से आयात पर निर्भर है।