सध्या जगभरात विमान प्रवासादरम्यान बॅगेजसाठी आकारले जाणारे शुल्क मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बॅगेचे वजन जास्त असल्यास, त्या नुसार शुल्क वाढत जाते. हेच वाढते शुल्क वाचण्यासाठी प्रवाशांनी एक नवीन आणि वेगळाच ट्रेंड सुरू केला आहे. या ट्रेंडला 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड' असे म्हणतात. चला तर जाणून घेऊया काय आहे हा ट्रेंड...
'फ्लाइंग नेकेड' याचा अर्थ असा नाही की, लोक कपड्यांशिवाय विमानातून प्रवास करत आहेत. उलट या ट्रेंडमध्ये, लोक वाढीव शुल्क वाचण्यासाठी मोठे किंवा जास्त वजनाचे सामान सोबत घेत नाहीत. त्याऐवजी, गरजेनुसार जास्तीत जास्त कपडे अंगावर घालून प्रवास करतात. या ट्रेंडमध्ये 'जेन-झी' आणि 'मिलेनियल्स' या दोन्ही पिढ्यांमधील प्रवाशांचा समावेश आहे.
'फ्लाइंग नेकेड' म्हणजे काय?डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, या ट्रेंडमध्ये प्रवासी फक्त त्यांचे फोन आणि पाकीट सोबत घेऊन प्रवास करतात. ते त्यांचे कपडे आणि इतर आवश्यक वस्तू खिशात आणि अंगावर घालतात. त्यानंतर, त्यांचे मोठे बॅगेज ते पोस्टद्वारे हव्या त्या ठिकाणी मागवून घेतात.
एस्केपच्या रिपोर्टनुसार, पोस्टद्वारे सामान मागवणे विमानात स्वतः सोबत बॅगेज घेऊन जाण्यापेक्षा स्वस्त पडते. एका सर्वेक्षणात १,००० पैकी ४८ प्रवाशांनी हे मान्य केले आहे की, एअरलाईन्स कंपन्या जाणूनबुजून बॅगेज पॉलिसीमध्ये गोंधळ निर्माण करून प्रवाशांकडून जास्त पैसे कमवत आहेत.
प्रवाशांनी सांगितला अनुभवया ट्रेंडमध्ये अनेक लोक एकावर एक कपड्यांचे थर घालून प्रवास करत आहेत. तीन प्रवाशांपैकी एक व्यक्ती ही युक्ती वापरत आहे. २८ वर्षीय राचेल केली यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियामधून आयर्लंडला येताना त्यांनी हा ट्रेंड वापरला. त्यांना अतिरिक्त बॅगेजसाठी १,००० डॉलर (सुमारे ८८ हजार रुपये) शुल्क द्यावे लागणार होते, पण या युक्तीने त्यांनी ते पैसे वाचवले. तसेच एका शिक्षकाने सांगितले की, याच युक्तीचा वापर करून त्यांनी ६०० डॉलर वाचवले.