सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 18:37 IST2024-06-17T18:36:47+5:302024-06-17T18:37:34+5:30
भारतात अनेक शहरांचा समावेश महाग शहरांमध्ये होतो, त्यात दिल्ली, मुंबई, बंगळुरू यासारख्या शहरांचा समावेश आहे. परंतु जगातही अनेक शहरे आहेत, जिथं राहणं परवडणारं नाही

सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
नवी दिल्ली - बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल आणि इतर राज्यातील जे लोक कामाच्या शोधात दिल्ली अथवा मुंबईला जातात, त्यांना तिथला खर्च खूप अधिक असल्याचं वाटतं. बहुतांश लोकांना तिथे राहण्यासाठी खूप भाडे द्यावे लागते असं सांगतात. भारतात दिल्ली, मुंबई, बंगळुरू ही महागडी शहरे आहेत. परंतु तुम्हाला जगात सर्वात महाग शहरांमध्ये टॉप लिस्टमध्ये कुणाचं नाव आहे माहिती आहे का?
लेटेस्ट मर्सर्ज २०२४ च्या कॉस्ट ऑफ लिविंग रिपोर्टनुसार, बाहेरून कामासाठी येणार्या लोकांसाठी हाँगकाँग हे सर्वात महाग शहर आहे. त्यानंतर सिंगापूर, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी स्विझरलँडचे ४ शहर येतात. त्यात ज्यूरिख, जिनेवा, बेसल आणि बर्न या शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे टॉप ३० शहरांमध्ये भारतातील एकाही शहरांचा समावेश नाही.
हाँगकाँगमध्ये राहण्याचा खर्च किती?
हाँगकाँग शहरात राहण्याचा खर्च पाहिला तर त्याचे आकडे पाहून तुम्हीही शॉक व्हाल. या शहरात वन बीएचके घरासाठी २० हजार ते ३५ हजार हाँगकाँग डॉलर द्यावे लागतात. त्याचे भारतीय चलनात सव्वा २ लाख ते ४ लाख रुपये होतात. एका हाँगकाँग डॉलरची किंमत १०.७० रुपये इतकी आहे. हाँगकाँगमध्ये एक लीटर दूध २५ ते ३० हाँगकाँग डॉलर आहे, भारतीय चलनात २७० ते ३२० रुपये दर आहेत.
भारतीय चलनात आकडेवारी पाहिली तर ब्रँडेड जीन्ससाठी ५३०० ते १०५०० रुपये मोजावे लागतात. याठिकाणी सर्वात महाग इथलं घराचे भाडे आहे. जर शहरात तुम्ही १ बीएचके शोधत असाल तर त्यासाठी एक लाख ते २ लाख ७५ हजार दर आहेत. जर ३ बीएचके रूम पाहाल तर त्यासाठी ५ लाख दरमहिना द्यावे लागतील. चांगले घर शोधले तर जवळपास ९ लाख रुपयेही द्यावे लागतात. घरातील वीज, पाणी या सुविधेसाठी २०००० ते २८००० खर्च आहे. इंटरनेटसाठी २२०० ते ५५०० रुपये द्यावे लागतात.
हेअरकटसाठी १७०० ते ५२०० रुपये, वैद्यकीय उपचारासाठी ६०० ते १२०० रुपये खर्च होतो. घरातील कामकाजासाठी फुलटाईम हेल्पर कामाला ठेवला तर त्याला महिन्याला ५० हजार रुपये पगार द्यावा लागतो. कारण याठिकाणी सरकारद्वारे हेल्पर्सला मिळणारा किमान पगार तितका आहे. जर तुम्ही पार्ट टाईम म्हणजे तासानुसार पैसे दिले तर तुम्हाला १ तासासाठी ७०० ते १५०० रुपये खर्च द्यावा लागतो.