रिषभ पंतचा जीव वाचवणारा व्यक्ती मृत्यूच्या दारात, विष प्यायल्यावर गर्लफ्रेंडचा मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:56 IST2025-02-13T16:55:34+5:302025-02-13T16:56:29+5:30
दोघांनाही नाजूक स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान बुधवारी रजतच्या गर्लफ्रेंडचा जीव गेला.

रिषभ पंतचा जीव वाचवणारा व्यक्ती मृत्यूच्या दारात, विष प्यायल्यावर गर्लफ्रेंडचा मृत्यू...
भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे. 25 वर्षीय रूडकी एका हॉस्पिटलमध्ये भरती आहे आणि डॉक्टर त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रजतनं 9 फेब्रुवारी रोजी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत विष प्राषण केलं होतं. दोघांनाही नाजूक स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान बुधवारी रजतच्या गर्लफ्रेंडचा जीव गेला. आता पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
रजत आणि त्याची गर्लफ्रेंड बुच्चा गावचे राहणारे आहेत. दोघांचीही जात वेगळी आहे. पण त्यांना लग्न करून संसार थाटायचा होता. दोघांचेही कुटुंबिय या लग्नासाठी तयार नव्हते. यादरम्यान तरूणीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न एका तरूणासोबत ठरवलं होतं. त्यामुळे दोघांनीही आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
रजत किंवा त्याच्या गर्लफ्रेंडच्या परिवारातील कुणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. पोलीस त्यांच्या पद्धतीनं चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, चौकशीनंतर जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.
डिसेंबर 2022 मध्ये रजत चर्चेत आला होता. कारण त्यानं रिषभ पंत याचा अपघातात जीव वाचवला होता. रजत त्याच्या एका मित्रासोबत घरी जात असताना रोडवर एक अपघात झाला. रजतनं कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं. त्याला हॉस्पिटलमध्येही नेलं. तेव्हा त्याला समजलं की, ती व्यक्ती रिषभ पंत आहे.