आईविना मुलाची जगण्याची एकाकी झुंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 08:52 IST2025-10-17T08:51:50+5:302025-10-17T08:52:18+5:30
माणसाची जगण्याची ऊर्मी कायमच कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रभावी असते. मग ती व्यक्ती वृद्ध असो, लहान मूल असो, आजारांनी जर्जर झालेला एखादी रोगी असो की जखमांनी, वेदनांनी कळवळणारा, श्वासासाठी धडपडणारा एखादा अपघातग्रस्त असो... हे जीवन सहजासहजी सोडून देण्याची कोणाचीही तयारी नसते...

आईविना मुलाची जगण्याची एकाकी झुंज!
आईविना अनेक दिवस जिवंत राहिलेल्या आणि त्यासाठी त्याच्या परीनं त्याला जे काही शक्य आहे, ते ते सारं करणाऱ्या एका लहान मुलाची कहाणी सध्या जगभरात व्हायरल होते आहे.
चीनमध्ये नुकतीच घडलेली ही घटना. आपल्या आईच्या मृत्यूनंतर दोन वर्षांच्या एका मुलानं अनेक दिवस नूडल्स आणि जेली खाऊन आपला जीव वाचवला. या मुलाची २८ वर्षीय आई झेंग यू हिचा एक मित्र गेले काही दिवस तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. दिवसांतील वेगवेगळ्या वेळी आणि गेले कित्येक दिवस तो तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. आधी तर त्यानं तिला बऱ्याचदा फोन केले; पण तिनं एकदाही फोन उचलला गेला नाही, नंतर तर तो बंदच झाला!
काय करावं आणि तिच्याशी कसा संपर्क साधावा... त्याला काहीच कळत नव्हतं; कारण आपल्या मुलासह ती एकटीच राहत होती. तिचा नवराही तिच्यासोबत नव्हता आणि इतर कुणाशी तिच्या मित्राचा संपर्क नव्हता. न राहवून शेवटी त्यानं पोलिसांना फोन केला.
झेजियांग प्रांतातील वेनझोउच्या कैंगनान काउंटीत पोलिस जेव्हा पोहोचले तेव्हा तेही अक्षरश: हादरले. पोलिसांनी दरवाजा वाजवला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांकडे चौकशी केली, पण त्यांनाही काहीच कल्पना नव्हती. पोलिसांनी शेवटी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तिथे त्यांनी जे काही पाहिलं ते अक्षरश: डोळे विस्फारणारं होतं.
झेंग तिच्या १० चौरस फुटांच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत पडलेली होती. तिच्या शेजारीच बेडवर हाडांचा सापळा झालेला तिचा मुलगा ‘खेळत’ होता. एक अत्यंत मळका शर्ट आणि डायपर एवढंच त्याच्या अंगावर होतं. डायपरही अतिशय घाणेरडं होतं. गेले कित्येक दिवस त्यातच त्यानं नैसर्गिक विधी केल्यानं त्याचा दुर्गंध येत होता.
घर बंद. आई ‘झोपलेली’. आईच्या अंगाखांद्यावर लोळूनही, तिला उठवूनही ती उठत नाही म्हटल्यावर, हंबरडा फोडून आकांडतांडव केल्यानंतरही, आई काहीच हालचाल करत नाही, आपल्याशी बोलत नाही, आपल्याला खायला-प्यायला देत नाही म्हटल्यावर जगण्यासाठी एखादं लहान मूल जे काही करेल, ते ते सारं या मुलानं केलं.
खाण्यासारखं घरात जे काही मिळेल ते खाऊन त्यानं आपलं पोट भरलं. आधी त्याला घरात जेली दिसली. ती त्यानं फस्त केली. मग त्याला काही स्नॅक्स दिसले. तेही त्यानं थोडे-थोडे करत खाऊन संपवले. आता काय? घरात खायला काहीच नाही! पोट भुकेनं कळवळल्यावर मग त्यानं फ्रिजमध्ये शोध घेतला. तिथेही काहीच नाही; पण एक कच्चा भोपळा मात्र त्याला तिथे दिसला. तोच थोडा-थोडा खाऊन मग त्यानं दिवस काढले! पोलिस आणि शेजाऱ्यांनी लगेच मुलाला स्वच्छ करून रुग्णालयात दाखल केलं. लहान मुलाच्या जगण्याच्या आकांक्षेची ही कहाणी सोशल मीडियावर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणते आहे..