आजपासून ४२ दिवस 'या' ९ गावांत TV-फोनवर बंदी, मोठ्या आवाजात बोलण्यासही निर्बंध, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:06 IST2025-01-14T15:05:30+5:302025-01-14T15:06:19+5:30
आजची युवा पिढीही वर्षोनुवर्ष सुरू असलेल्या या प्रथा परंपरेचे पालन करतात. इथं येणाऱ्या पर्यटकांनाही ही प्रथा पाळावी लागते

आजपासून ४२ दिवस 'या' ९ गावांत TV-फोनवर बंदी, मोठ्या आवाजात बोलण्यासही निर्बंध, कारण...
मनाली - हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी देवी देवतांचा वास आहे. कांगडा, शिमला, मंडी, बिलासपूरसह अनेक जिल्हे आहेत ज्याठिकाणी कुठे ना कुठे प्रसिद्ध शक्तीपीठ आहे. इथं लाखो श्रद्धाळू भाविक दरवर्षी मंदिरात दर्शनासाठी येतात. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात देव प्रथा मोठ्या प्रमाणात आहे. याच परंपरेतून मंगळवारी मकरसंक्रांतीपासून ९ दिवस मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले जातात. त्यासोबत गोंगाट करण्यासही मज्जाव घालण्यात येतो.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पर्यटन नगरी मनाली असा भाग आहे जिथे आजही लोक त्यांची प्राचीन संस्कृती जपून आहेत. याठिकाणाचे गावकरी आता पुढील ४२ दिवस ना टीव्ही सुरू करणार, ना मंदिरात पूजा अर्चना करणार, उल्लेखनीय म्हणजे या कालावधीत गावकऱ्यांचे मोबाइलही सायलेंट मोडवर असतात, कोणाचीही रिंगटोन ऐकायला येत नाही. हे ऐकून तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल परंतु हे सत्य आहे. देवी देवतांच्या आदेशावर ४२ दिवसांसाठी ही प्रथा पाळली जाते. दरवर्षी ही प्रथा न चुकता गावकरी पाळतात.
मनालीतील गावांसोबतच गौशाल परिसरातील ८ गावांमध्येही देव आदेश जारी झालेत. याठिकाणी टीव्ही, मोबाईल आणि मंदिरातील घंटी वाजवण्यास निर्बंध आहेत. उझी घाटीतल्या ९ गावांमध्ये हजारो वर्षापासून ही देव प्रथा परंपरा ४२ दिवसांसाठी सुरू आहे. या ४२ दिवसांच्या काळात या गावांमधील कुणीही गावकरी एकमेकांशी मोठ्या आवाजात बोलणार नाही. मंदिरात पूजा केली जाणार नाही. देवळातील घंटी बांधून ठेवली जाते. गावकऱ्यांनुसार, आराध्य देवता गौतम ऋषी, ब्यास ऋषी आणि नागदेवता यांच्याकडून हे देव आदेश जारी केले जातात.
मकर संक्रांतीच्या नंतर देवी देवता त्यांच्या तपस्येत गुंग होतात अशा वेळी देवी देवतांना शांत वातावरण हवं असते. त्यामुळे टीव्ही, रेडिओ मोबाईल सर्वकाही गावकऱ्यांकडून बंद केले जाते. मनालीच्या गौशाल, कोठी सोलंग, पलचान, रूआड, कुलंग, शनाग, बुरूआ, मझाच याठिकाणी हे देव आदेश आहेत. आजची युवा पिढीही वर्षोनुवर्ष सुरू असलेल्या या प्रथा परंपरेचे पालन करतात. इथं येणाऱ्या पर्यटकांनाही ही प्रथा पाळावी लागते. मनालीच्या सिमसा येथील देवता कार्तिक स्वामी मंदिरातील दरवाजे १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.