Eggs and School students : कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत माध्यान्ह भोजनात अंडी देण्यावरून वाद निर्माण झाला. शाळेतील १२० पैकी ८० विद्यार्थ्यांनी चक्क शाळा सोडण्याची धमकी दिली. ज्यामुळे शिक्षण विभाग आणि प्रशासनात खळबळ उडाली. वादाचे कारण शाळेच्या आवारात अंडी शिजवण्यावरून आहे. गावकरी आणि पालकांचे म्हणणे आहे की शाळा एका प्राचीन वीरभद्रेश्वर स्वामी मंदिराजवळ आहे आणि धार्मिक परंपरेनुसार, मंदिराभोवती मांस किंवा अंडी शिजवण्यास मनाई आहे.
धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
गावकऱ्यांचा आरोप आहे की वर्षानुवर्षे परस्पर करारानुसार, अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी अंडी दिली जात होती. तसेच अंडी न खाणाऱ्यांना केळी किंवा पीठ दिले जात होते. एका पालकाने सांगितले की, आम्ही आमच्या मुलांसाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) मागत आहोत, कारण शाळेत अंडी शिजवली जात आहेत. ही गोष्ट आमच्या धार्मिक श्रद्धेच्या विरुद्ध आहे. आम्ही शाळेला आमच्या मुलांना अंड्यांऐवजी केळी देण्यास सांगितले होते.
शाळेच्या आवारात संमतीशिवाय शिजवली अंडी
पालकांनी स्पष्ट केले की, ते अंडी वाटण्याच्या धोरणाविरोधात नाहीत, परंतु शाळेत अंडी शिजवण्याच्या प्रक्रियेवर संतापले आहेत. त्यांचा आरोप आहे की कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा प्रशासनाने अंडी शिजवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे स्थानिक परंपरांना धक्का बसला आहे. त्याच वेळी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना आवाहन केले आणि म्हटले की, कृपया अंडी आणि केळीच्या वादाच्या पलीकडे जाऊन मुलांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
मंत्र्यांनी बोलवली बैठक
प्रकरण वाढत असल्याचे पाहून शिक्षण विभाग अँक्शन मोडमध्ये आला आहे. मंड्या जिल्हा प्रभारी मंत्री चेलुवरय्या स्वामी म्हणाले की, आम्ही शिक्षण विभाग, शाळेचे मुख्याध्यापक आणि पालकांसोबत बैठक बोलावली आहे. सर्वांशी बोलून तोडगा काढला जाईल.