मित्रानं दिलं चॅलेंज, मारल्या 2000 दंडबैठका, आता पोहोचला रुग्णालयात! डॉक्टर म्हणाले किडनी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:50 IST2025-03-25T13:49:08+5:302025-03-25T13:50:09+5:30
या वेदना आपोआपच थांबतील, असे या तरुणाला वाटले. मात्र चौथ्या दिवशी या तरुणाची प्रकृती आणखीनच खालावली. यानंतर तो थेट रुग्णालयात पोहोचला...

मित्रानं दिलं चॅलेंज, मारल्या 2000 दंडबैठका, आता पोहोचला रुग्णालयात! डॉक्टर म्हणाले किडनी...
रशियातील व्लादिवोस्तोक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या मित्रासोबत 2000 स्क्वॅट्स (दंडबैठका) मारण्यासाठी 20 हजार रुबलची चॅलेंज लावली होती. यानंतर, या तरुणाने खरोखरच 2000 दंडबैठका मारल्या आणि चॅलेंज जिंकली. मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला वेदना जाणवू लागल्या.
या वेदना आपोआपच थांबतील, असे या तरुणाला वाटले. मात्र चौथ्या दिवशी या तरुणाची प्रकृती आणखीनच खालावली. यानंतर तो थेट रुग्णालयात पोहोचला. तेथे त्याची तपासणी करण्यात आली. यात त्याच्या किडनीने काम करणे बंद केल्याचे आढळून आले. यानंतर, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाच वर्षांपासून केला नव्हता व्यायाम -
डॉक्टरांसोबत बोलताना संबंधित तरुणाने सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून आपण ना कुठला खेळ खेळलो आहोत, ना एक्सरसाइज अथवा व्यायाम केलेला आहे. आपण 2000 स्क्वॅट्स अथवा दंडबैठका सहज मारू असे त्याला वाटत होते. खरे तर त्याने चॅलेंज पूर्णही केली. मात्र, ही चॅलेंज त्याला अत्यंत महागात पडली आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारामुळे त्याचे स्नायू दुखावले गेले आहेत आणि त्याच्या किडनीवरही याचा वाईट परिणाम झाला आहे.
हा तरुण आता रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जर तो आधीच आला असता, तर त्याची प्रकृती एवढी खालावली नसती, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याच्या मित्रांनाही याचा मोठा धक्का बसला आहे. कधी कधी गमतीशीर चॅलेंजदेखील कशा प्रकारे जीवघेणी ठरू शकते. हे या संपूर्ण प्रकारावरून स्पष्ट होते.