ग्रामीण भागात आजही कोंबड्याच्या आरवण्याने लोकांची पहाट होते. पण कोंबड्याच्या आरवण्यावरूनच गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्समधील एका कोर्टात चक्क एक अजब केस सुरू होती. महत्त्वाची बाब म्हणजे ही केस कोंबड्याने जिंकली असून कोर्टाने त्याला आरवण्याचा पूर्णपणे अधिकार असल्याचं म्हटलं आहे.
झालं असं की, क्रोनी या महिलेकडे कोंबडा आहे. पण या कोंबड्याच्या बांक देण्याने तिच्या शेजारी लोकांना त्रास होत होता. त्यामुळे हे प्रकरण थेट कोर्टापर्यंत गेलं. इतकेच काय तर कोर्टात गेल्यावर ही घटना राष्ट्रीय मुद्दा ठरली. त्यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कोंबडा हा फ्रान्सचा राष्ट्रीय प्रतीक आहे.
कोंबड्याच्या आरवण्यावरून शहरी आणि ग्राणीम लोक असे दोन गट पडले. शहरी लोकांचं मत होतं की, कोंबड्याच्या आरवण्याने सकाळी-सकाळी त्यांची झोप उडते. इतकंच नाही तर एकाने तर चक्क ध्वनी प्रदूषणाचाही दावा केला. तेच ग्रामीण लोकांचा कोंबड्याच्या आरवण्यावर काहीच आक्षेप नव्हता. अखेर गुरूवारी कोर्टाने आपला निर्णय सुनावला आणि सांगितले की, या पक्ष्याचं बोलणं हा त्याचा अधिकार आहे.
मोरिस नावाच्या या कोंबड्याला क्रोनी फेस्सयू यांनी पाळलं आहे. क्रोनी यांच्या वकिलांनी सांगितले की, 'मोरिस केस जिंकला आहे'. क्रोनी यांनी सांगितले की, आजपर्यंत कोंबड्याच्या आरवण्यावर कुणीही आक्षेप घेतला नव्हता. जेव्हा एक दाम्पत्य इथे सुट्टी घालवण्यासाठी आलंय, त्यांनाच हा त्रास होतो आहे. लुइस बिरन आणि त्याच्या पत्नीने तक्रार केली होती की, कोंबड्याच्या आरवण्याने सकाळी त्यांची झोपमोड होते.
कोर्टाच्या निर्णयानंतर क्रोनी म्हणाल्या की, हा त्यांच्यासोबत त्यांच्यासारख्या लोकांचा विजय आहे. त्या फार आनंदी आहेत. मोरिस नावाच्या एका कोंबड्यामुळे लाखो लोकांना एकत्र आणलं आणि लोकांनी त्याच्यासाठी 'सेव्ह मोरिस' असं अभियानही चालवलं होतं.