बापरे! चीन आता पाळीव प्राण्यांची करतंय प्लास्टिक सर्जरी; कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 19:26 IST2023-12-28T19:14:54+5:302023-12-28T19:26:26+5:30
चीन आपल्या पाळीव प्राण्यांची प्लास्टिक सर्जरी करण्यात व्यस्त आहे. प्राणीप्रेमींना जेव्हा याबाबत समजलं तेव्हा त्यांनी याला जोरदार विरोध करत ते बंद करण्याची मागणी केली.

बापरे! चीन आता पाळीव प्राण्यांची करतंय प्लास्टिक सर्जरी; कारण ऐकून बसेल धक्का
चीन नेहमीच विचित्र खाद्यपदार्थ आणि इतर गोष्टींसाठी जगभरात ओळखला जातो. अशाच एका विचित्र ट्रेंडमुळे चीन पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे, ज्याबद्दल कळल्यानंतर तुम्हालाही विचार करायला भाग पाडलं जाईल. चीन आपल्या पाळीव प्राण्यांची प्लास्टिक सर्जरी करण्यात व्यस्त आहे. प्राणीप्रेमींना जेव्हा याबाबत समजलं तेव्हा त्यांनी याला जोरदार विरोध करत ते बंद करण्याची मागणी केली.
'हा प्राण्यांवर सुरू असलेला क्रूरपणा आहे, तो ताबडतोब थांबवावा' असं या विषयावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर, चीन प्राण्यांवर शस्त्रक्रिया का करत आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चीनमधील लोक आपल्या पाळीव प्राण्यांचे कान प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर मिकी माऊससारखे बनवण्यासाठी या प्लास्टिक सर्जरीची मदत घेत आहेत. यामुळे प्राण्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पाळीव प्राण्यांच्या प्लास्टिक सर्जरीबाबत तज्ज्ञांनी हे अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलँ असून, ती लवकरात लवकर थांबवण्याची मागणी केली आहे. प्राण्यांच्या क्लिनिकबाहेरची जाहिरात लोकांच्या लक्षात आल्यावर पाळीव प्राण्यांची प्लास्टिक सर्जरी उघडकीस आली. या जाहिरातीचे वृत्त सर्वत्र पसरताच प्राणीप्रेमींनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.
रिपोर्टनुसार, देशात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांवर बंदी आहे, तरीही अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया गुपचूप केल्या जात आहेत. असं सांगितलं जात आहे की हे क्लिनिक पाळीव प्राण्यांसाठी केवळ 40 डॉलर्स म्हणजेच 3,300 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत कॉस्मेटिक सर्जरीची अनोखी ऑफर देऊन लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होतं. या सर्जरीद्वारे काही लोक आपल्या पाळीव मांजरी आणि कुत्र्यांचे कान मिकी माऊससारखे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.