Noorjahan Mango: या राज्यात आढळतो 4 किलोचा आंबा, एका आंब्याची किंमत 2000 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 15:36 IST2022-05-04T15:35:40+5:302022-05-04T15:36:14+5:30
Noorjahan Mango: मूळ अफगाणिस्तानचा असणाऱ्या या आंब्याची काही मोजकी झाडे भारतात उपलब्ध आहेत.

Noorjahan Mango: या राज्यात आढळतो 4 किलोचा आंबा, एका आंब्याची किंमत 2000 रुपये
Noorjahan Mango: फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा सर्वांनाच आवडतो. वर्षातील फक्त चार महिने उपलब्ध असणारे हे फळ देशातील कानाकोपऱ्यात मिळते. या फळाच्या विविध जाती आहेत. यातील एक लोकप्रिय जात आहे 'नूरजहां' आंबा. हा सर्वात मोठा आंबा म्हणून प्रसिद्ध आहे. आंब्याच्या शौकीनांसाठी यंदाच्या मोसमात जवळपास 4 किलो वजनाचा आंबा मिळण्याची शक्यता आहे. एका उत्पादकाने हा अंदाज वर्तवला आहे.
मध्यप्रदेशात आढळतो हा आंबा
मूळ अफगाणिस्तानात आढळणाऱ्या या नूरजहां आंब्याची काही मोजकी झाडे मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागात आहेत. हा परिसर गुजरातशी जोडला गेलेला आहे. इंदुरपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या कट्ठीवाडातील आंबा उत्पादक शिवराज सिंह जाधव सांगतात की, यंदा त्यांच्या शेतातील नूरजहां आंब्याच्या तीन झाडांना 250 फळे लागली आहेत. येत्या 15 जूनपर्यंत ही फळे पिकून विक्रीसाठी तयार होतील. या आंब्याचे वजन 4 किलोग्रामपर्यंत जाते.
2000 रुपयांना एक आंबा
त्यांनी पुढे सांगितले की, यंदा वातावरणातील बदलामुळे आंब्याचे अनेक फुलं फळं बनण्यापूर्वीच गळून पडले. गेल्या वर्षी या आंब्याचे सरासरी वजन 3.80 किलोग्राम होते. जाधव यंदा नूरजहाँचा एक आंबा 1000 ते 2000 रुपयांना विकण्याच्या तयारीत आहेत. मागील वर्षी एका फळाची किंमत 500 ते 1500 रुपये होती.