जगात वेगवेगळ्या गोष्टी ट्रेन्ड होत असतात, जे सोशल मीडियातही नेहमी चर्चेत राहतात. असाच एक ट्रेन्ड चीनमध्ये सुरू करण्यात आला आहे. याचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. चीनमध्ये अविवाहित तरूण-तरूणींचं लग्न जुळवण्यासाठी एक अनोखी ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
या लव्ह स्पेशल ट्रेनचा प्रवास १० ऑगस्टला सुरू झाला आणि त्यात एक हजारांपेक्षा अधिक तरूण-तरूणी प्रवास करत आहेत. देशातील अविवाहितांना पार्टनर शोधून देण्यास मदत करण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे. कारण चीनमध्ये साधारण २० कोटी लोक अविवाहित आहेत.
चीनच्या चोंगकिंग नॉर्थ येथून कियानजियांग स्टेशन दरम्यान चालणारी ही ट्रेन लोकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की, ही ट्रेन आठवड्यातून दोनदा चालवण्याची मागणी केली जात आहे. चीनमध्ये १९७० पासून लागू करण्यात आलेल्या १ अपत्याच्या धोरणामुळे देशातील मुला-मुलींचा दर विस्कटला आहे. यामुळे लोकांना लग्नासाठी समस्या होत आहेत. पण २०१६ मध्ये एक अपत्याचं धोरण रद्द केलं होतं. आता या ट्रेनमधून लग्न जुळण्याचं प्रमाण हे सरासरी १० टक्के आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच २०१८ मध्ये एक हजारांपैकी केवळ ७.२ टक्केच लोकांना लग्न करण्याची संधी मिळाली होती. या आकडेवारीमुळे चीनमध्ये लग्नाचा दर गेल्या एक दशकापेक्षाही सर्वात कमी राहिला. एशिया वन मीडियानुसार, या ट्रेनमध्ये प्रवास करणारा हुआंग सॉन्ग म्हणाला की, अशाप्रकारचा प्रयत्न जोडीदार शोधण्यासाठी फारच रचनात्मक आहे. याने प्रवास तर करायला मिळतोच, सोबतच जोडीदारही सहजपणे मिळतात.
या ट्रेनमध्ये प्रवास करणारा यांग हुआन ने सांगितले की, तुम्ही भलेही योग्य जोडीदार शोधू शकले नाही तर तुम्हाला चांगले मित्र नक्कीच मिळतात. ट्रेनमध्ये एक हजार लोकांसोबत जेवण्याचा आनंद घेण्यासोबतच प्राचीन शहर झुओमध्ये थांबण्याची संधीही मिळते.