उशिरा लग्न लावल्यास ५ हजारांचा दंड!

By Admin | Updated: January 12, 2016 02:14 IST2016-01-12T02:14:12+5:302016-01-12T02:14:12+5:30

गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा मुहूर्त चुकवण्याची प्रथाच पडली आहे. यामुळे वेळेवर लग्नासाठी पोहोचणाऱ्या वऱ्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

Late 5000 penalty for marriage! | उशिरा लग्न लावल्यास ५ हजारांचा दंड!

उशिरा लग्न लावल्यास ५ हजारांचा दंड!

- अनिल गवई, खामगाव (जि.बुलडाणा)

गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा मुहूर्त चुकवण्याची प्रथाच पडली आहे. यामुळे वेळेवर लग्नासाठी पोहोचणाऱ्या वऱ्हाड्यांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे उशिरा लग्न लावणाऱ्या वधू आणि वराकडील मंडळींना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा एकमुखी ठराव बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने घेतला आहे.
वेळेवर लग्न लावण्यासाठी एक आदर्श संहिताच महाराष्ट्र भावसार समाजाशी संलग्नित असलेल्या बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने तयार केली आहे. रविवारी त्याबाबतचे विविध ठराव संमत करून त्यांची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. उशिरा लग्न लावणाऱ्या वधू आणि वराकडील मंडळींना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड भावसार समाज मंडळ वसूल करणार आहे. आदर्श आचार संहिता तयार करताना पर्यावरण रक्षणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून विवाह सोहळा, व्रतवैकल्य, वाढदिवस, दशक्रिया विधी यांसारख्या सामाजिक उपक्रमामध्ये प्लास्टीक पत्रावळ्या, द्रोणसुद्धा न वापरण्याचा ठराव या वेळी घेण्यात आला. त्यांचा वापर केल्यास संबंधितांना २१०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

लग्न लावण्यास उशीर होत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाहुणे मंडळींना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे भावसार समाजाने ‘समय के साथ चलो’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
- किशोर जुनगडे, अध्यक्ष, बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळ

पर्यावरण रक्षण आणि समाजाच्या हितासाठी विविध समाजोपयोगी ठराव पारित करण्यात आले. या ठरावाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी आपण महाराष्ट्रभर दौरे करणार आहोत.
- डॉ. विजय जिराफे, अध्यक्ष,
विदर्भ भावसार समाज मंडळ

Web Title: Late 5000 penalty for marriage!