(Image Credit : www.cbsnews.com)
साधा बर्फाचा तुकडा आपण काही सेकंदापेक्षा जास्त हातावर ठेवू शकत नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने चक्क बर्फाने भरलेल्या बॉक्समध्ये बसून वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला आहे. अॅथलीट जोसेफ कोएबर्लने शनिवारी एका बर्फाने भरलेल्या बॉक्समध्ये तब्बल २ तास ८ मिनिटे आणि ४७ सेकंद वेळ घालवून वर्ल्ड रेकॉर्ड कायम केला.
जोसेफने हा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड व्हियन्नामध्ये केलाय. जोफेस बर्फाने भरलेल्या एका बॉक्समध्ये बसला आणि त्याच्या खांद्यापर्यंत वरून वरून बर्फ टाकण्यात आलाय. यावेळी त्याने केवळ एक छोटी पॅंट घातलेली होती. थंड बर्फात काही मिनिटे घालवणं कठीण होऊन बसतं, तिथे जोसेफने बर्फाच्या बॉक्समध्ये दोन तास वेळ घालवला.
जोसेफआधी हा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड चीनच्या जिन सोंगहाओच्या नावावर होता. त्याने हा रेकॉर्ड २०१४ मध्ये कायम केला होता. सोंगहाओने एकूण ५३ मिनिटे आणि १० सेकंद इतका वेळ बर्फाच्या बॉक्समध्ये घालवला होता.
जोसेफ जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड करून बॉक्समधून बाहेर आला, तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या शरीराची तपासणी केली. तो पूर्णपणे फिट होता. जोसेफ म्हणाला की, तो यापेक्षाही जास्त वेळ बर्फात बसून राहू शकतो. पण त्याला याची गरज वाटली नाही. कारण तो आधीच जास्त वेळ बसून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करून बसला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही लोकांनी जोसेफच्या या वर्ल्ड रेकॉर्डचं कौतुक केलं, तर काहिंनी याला मूर्खपणा असं म्हटलं. लोक म्हणाले की, एखादा मूर्ख माणूसच असं करू शकतो.